गायक विवेक पांडे यांचा आज वणीत सत्कार

वाचा विवेक पांडे यांच्यावर वणी बहुगुणीचे हे प्रासंगिक व विशेष आर्टिकल

निकेश जिलठे, वणी: क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. कवी ग्रेस यांनी कविता, गाण्याबद्दल अगदी थोडक्यात पण खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. गळ्यातली हिच सहजता सांभाळणारे कलावंत म्हणजे विवेक हरिप्रसाद पांडे. मधूर गळ्याची देणगी असलेले विवेक पांडे यांचे गाणे ऐकले नसेल असा एकही रसिक परिसरात नसणार. गेल्या 35 वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या कलाकारांचा प्रवास आजही त्याच जोशात आणि उत्साहात सुरू आहे. आज रविवारी दिनांक 1 जानेवारी रोजी वणीत विदर्भ आयडॉल ही स्पर्धा घेण्यात आली. वरोरा रोड येथील बाजोरिया लॉनमध्ये ही स्पर्धा सध्या सुरू आहे. संध्याकाळी 10 टेन स्पर्धकांमध्ये सामना रंगणार आहे. याच वेळी संगीत क्षेत्रात योगदानाबद्दल योगदानाबद्दल विवेक पांडे यांचा सत्कार केला जाणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

विदर्भ आयडॉल स्पर्धेतील एक क्षण

असा आहे विवेक पांडे यांचा संगीत प्रवास…
तसं पाहिलं तर विवेक पांडे यांची ओळख म्हणजे महसूल विभागाचे एक अधिकारी. सध्या ते वणी येथे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. सोबतच त्यांची दुसरी ओळख म्हणजे एक अष्टपैलू गायक, गझल, वेस्टर्न, सुगम, भक्तीगीत, फिल्मी, शास्त्रीय, पॉप असे संगितातील विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळलेत.

विवेक पांडे यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास बालपणीच सुरू झाला, तेही स्वयं अध्ययनातून… रेडियोवर गाणे ऐकायचे व ते घरी मित्रांना ऐकवायचे. फक्त याच आवडीतून त्यांचे गाणे तयार झाले. बुलबुलतरंग व हार्मोनियम हे वाद्यदेखील ते शिकले. वयाच्या 20 व्या वर्षी वणीत असलेल्या ऑर्केस्ट्रांमधून त्यांनी स्टेज परफॉर्मन्सला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी गझल, सुगम संगीत याचे शेकडो सोलो प्रोग्रॅम केले. विशेष म्हणजे 20 ते 25 वर्षांपूर्वी कराओके ट्रॅक सिंगिग या प्रकाराची ओळखच वणीकरा़ंना विवेक पांडे यांनी करून दिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तसं पाहिलं तर वणीला विदर्भाचं पुणं म्हटलं जायचं. मात्र एक काळ असा आला होता की वणीतील संगीतक्षेत्राला एक मरगळ आली. परिसरात एकदुसरा संगीत कार्यक्रम झाला तरी तो बाहेरगावातील असायचा. अशा वेळी शहरातील काही युवा वादक, गायक व हौशी संगीत प्रेमी यांना एकत्र करत त्यांच्या मार्गदर्शनात स्वरसाज एन्टरटेनमे़ट हा गृप स्थापन झाला. या गृपमधून अनेक नवीन गायक, वादक यांना स्टेज मिळाला. अनेक होशी संगीत प्रेमी संगीत क्षेत्राकडे वळले. त्यापासूनच प्रेरणा घेत आज वणीत अनेक गृप्स कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आज वणीत बाहेरगावातील नाही तर वणीतील स्थानिक कलावंतांचा संचच कार्यक्रम करतो. वणीचे संगीत क्षेत्र बहरवण्यात विवेक पांडे यांचा मोठा वाटा आहे.

यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्यांनी सहभाग तर घेतलाच शिवाय या स्पर्धेत बक्षिस देखील मिळवले आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात गाजलेली यवतमाळ आयडॉल ही स्पर्धा जिंकून ते पहिले यवतमाळ आयडॉल ठरले. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्पर्धेत त्यांनी आपल्या विभागाचे प्रतिनिधीत्व करत राज्यस्तरीय स्पर्धा देखील गाजवली.

शासनाच्या एका कार्यक्रमात गाणे सादर करताना सहकलाकरां सोबत विवेक पांडे

 

संगीत क्षेत्रात वावर असला तरी कर्तव्याकडे त्यांचे कथीही दुर्लक्ष झाले नाही. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोकांना ते परिचित आहेत. शासनानेदेखील त्यांची दखल घेत त्यांचा जिल्ह्यातील उत्कृष्ट तलाठी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर कोवीड काळात केलेल्या प्रशासकीय कामासाठी त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणूनही गौरवण्यात आले आहे.

संगित क्षेत्रासोबतच त्यांचा क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. व्हॉलिबॉल या खेळात त्यांनी डिपार्टमेन्टल स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर आजही या हाताची त्या हाताला माहिती न पडता त्यांचे सामाजीक कार्य अविरत सुरू आहे.

जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या व्हॉलिबॉल हा खेळात सहभाग

अशा या हरहुन्नरी कलाकाराला वणी बहुगुणीतर्फे ही एक छोटीशी मानवंदना…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.