वणीत भीषण पाणीटंचाईचे सावट

तहान भागवण्यासाठी नगर परिषदेची धावपळ

0

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वणीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवरगाव धरणामध्ये फक्त 42% पाणी उरलेले आहे. त्यामधून जवळपास 3.58 % पाणी वणी शहरासाठी आरक्षित असल्याची माहिती नगर परिषदेचे जलपूर्ती सभापती निलेश होले यांनी दिली. आता हिवाळा सुरू असतानाच ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात काय होईल ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

डिसेंबर महिन्यात तीन दिवसाआड एकदा व तेही एकाच तास पाणी देण्यात येणार आहे. जर असाच पाणीपुरवठा करीत राहल्यास धरणात शिल्लक असलेले पाणी हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत वणी शहराची तहान भागवणार. त्यानंतर नगर परिषद टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार, शिवाय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 15 दिवसातून एकदाच पाणी सोडण्यात येणार. अगोदर नवरगाव धरणातून 7 दिवसातून एकदा पाणी दिल्या जात होते हे महत्वाचे.

वणीकरांची तहान भागविण्यासाठी रांगणा भुरकी येथून पाणी आणण्यासाठी 15 करोड 11 लाख रुपयांचा निधी नगर परिषदेच्या प्राप्त झाला आहे. सदर काम हे मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती जलपूर्ती सभापती यांचेकडून मिळाली आहे. पण यासाठी किती वेळ लागणार हे नक्की सांगता येत नाही.

सध्या निर्गुडा नदीवर बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद आहे. जेव्हा या बंधाऱ्यांची पाहणी केली तेव्हा समजले की हा तात्पुरता बंधारा बांधण्यात येत आहे. सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून हा बंधारा बांधण्यात येत आहे. परंतु नदीला आता पाणी नसल्याने व धरणातून पाणी सोडल्यावरही हा बंधारा किती पाणी अडवून धरणार याबाबत काहीच शास्वती नाही. काहीतरी भूलथापा देऊन नगर परिषद जनतेची दिशाभूल करीत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.

सिमेंट पोते बांध घालून पाणी अडवण्याचा प्रयत्न

आता नदीला जे पाणी आहे त्याचा रंग हिरवा झाला आहे. नदीच्या पाण्यावर शेवाळ तरंगताना दिसत आहे आणि हेच पाणी वणीकर जनतेला प्यावे लागत आहे. बाजूलाच असलेल्या वसंत विहार येथील सदनिकेतील संपूर्ण घाण पाणी सरळ नदीत सोडण्यात येत आहे. याबाबत मीडियामध्ये बातम्या आल्यावर ते पाणी अडवण्यात आलं आहे. त्यातच महत्वाचे म्हणजे जलशुद्धीकरण यंत्रही जीर्ण झाले आहे. यामुळे साहजिकच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे आता कुणीही लक्ष देण्यास तयार नाही.

‘मिशन निर्गुडे’चं काय झालं ?

काही महिन्यांपूर्वी वणीमध्ये ‘मिशन निर्गुडा’ सुरू करून जनतेकडून निधी गोळा करण्यात आला. थोडीफार सफाई करून निर्गुडा सफाईचा देखावा करण्यात आला. आता हे मिशन निर्गुडा चालविणारे कुठे गेले त्यांचा पत्ता ही नाही. कुणी या पाण्याचा प्रश्न आता उचलताना दिसून येत नाही. या मिशन निर्गुडा मध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. प्रसार मध्यमातून स्वतःची जाहिरात करून घेतली. आता हे सर्व नेते कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

यामध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार, नगराध्यक्ष, डॉ लोढा नगर परिषदेच्या नगरसेवक अशा नामवंत व्यक्तींनी सहभाग घेतला होता. आता या जीवनदायनी नदीची दुर्दशा काय आहे हे पाहायला कुणीही येत नाही. याचे बोलके चित्र जनतेसमोर निर्गुडा नदीची अवस्था पाहल्यानंतर येत आहे. काही प्रभागमध्ये ट्यूबवेल खोदून पाणीपुरवठा केला जात आहे.परंतु उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यावर पाणी पुरवठा कसा करणार हा प्रश्न उपस्थित होते आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.