विवेक तोटेवार, वणी: शहरात छुप्या रितीने येणारा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू एलसीबीने शिताफीने रोखला. सोमवारी रात्री ही कार्यवाही करण्यात आली. यात सुमारे पावने दोन लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला पांढरकवडा मार्गावरून वणीत प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी लाल पुलिया परिसरातील देशप्रेमी हॉटेलजवळ सापळा रचला. रात्री 11 वाजताच्या सुमारास राजूर जवळ हुंडाई कंपनीची व्हरणा ही कार (MH 34 AA7766) पोलिसांना दिसली. त्यावरून पोलिसांनी ही माहिती पथकाला दिली.
या वाहनाच्या मागे एक ट्रक तर या वाहनाच्या पुढे एक ट्रक उभा केला. पथक उभे असलेल्या जागी कार येताच ट्रकने ब्रेक दाबून तस्कराची कार अडवली. कारच्या मागे पुढे ट्रक असल्याने वाहन चालकाला पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखू आढळून आला.
यामध्ये 108 हुक्का मजा तंबाखू 200 ग्रॅम वजनाचे 160 नग, क्रेझ सुगंधीत तंबाखूचे 450 ग्रॅम वजनाचे 22 नग असा एकूण 1 लाख 62 हजारांचा तंबाखू, सहा लाखांची कार व मोबाईल असा एकूण 7 लाख 62 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडीतून आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबिन (30) रा. साईनगरी वणी याला अटक करण्यात आली.
आरोपीवर अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांच्या फिर्यादीवरून कलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011, 26 (2) कलम 27, कलम 30 (2) (अ), 59, 188, 272, 328, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, प्रदीप परदेशी पोलीस अधीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सऊनी अमोल मुळे, अमोल कडू, सुधीर पिदूरकर, सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, महेश जाधव, गणेश फुके यांनी केली.
Comments are closed.