गाडीला चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट

भर दिवसा मारेगाव येथून दुचाकी लंपास

भास्कर राऊत, मारेगाव: पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची गाडी अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला. ही घटना मारेगाव शहरात भर दुपारी घडली. या घटनेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. गाडीची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील रहिवासी असलेले कैलास लक्ष्मण जुमनाके हे काही कामानिमित्त आपली दुचाकी होंडा शाईन क्र. MH 29-BR 8257 ने मारेगाव येथे आले होते. गावी परत जाताना मारेगाव वणी रोडवरील बजरंग बलीच्या मंदिराजवळ ते तहान लागल्याने ते एका पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेले. पानठेल्यावर जवळ त्यांनी गाडी लावली मात्र त्याची चाबी काढायला ते विसरले. 

पाणी पिऊन परत आल्यावर त्यांना ठेवलेल्या ठिकाणी गाडी आढळून आली नाही. ही घटना मंगळवारी दि. 30 जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास घडली. चोरी गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे 40 हजार आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला असून मारेगाव पोलीस आरोपीच्या शोधात आहे.

भर दिवसा घडलेल्या या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वणी शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा मारेगाव तालुक्यात तर वळवला नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Comments are closed.