आरोग्य विभागाला रिक्त पदाचा ‘आजार’ 85 पदे रिक्त

जब्बार चीनी, वणी: वन संपदा व नैसर्गिक खनिजांनी संपन्न असलेल्या वणी उपविभागाच्या आरोग्य विभागाला सध्या रिक्त पदांचा आजार झाला असून त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभागात एकूण पदापैकी तब्बल 47 टक्के पदं रिक्त आहे. या रिक्त पदामुळे कर्मचा-यांवर अधिकचा भार आला असून परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दोन दशकांपूर्वी ग्रामीण रुग्णालय आंबेडकर चौक परिसरात होते. रुग्णांची वाढती संख्या व जुनी झालेल्या वास्तूमुळे शहराच्या बाहेर दामले ले आउटच्या जवळ नवीन जागी एका भव्य इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे स्थानांतरण झाले. ग्रामीण रुग्णालयाला बिल्डींग तर मिळाली. मात्र बिल्डिंग ही एकमात्र जमेची बाजू सोडली तर इथल्या आरोग्य सेवेत आजपर्यंत कोणताही प्रभावी बदल झाला नाही.

पंचायत समिती वणी अंतर्गत आरोग्य विभागात एकूण 181 पदे मंजूर आहेत. यातील तब्बल 85 पदे रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे यात 2 वैदयकीय अधिकारी, 16 समुदाय आरोग्य अधिकारी, एक पुरूष आरोग्य सहाय्यक, 4 महीला कंत्राटी आरोग्य सेवक, दोन कंत्राटी अधिपरिचारिका, 4 प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या 4 जागा मंजुर असून हे 4 ही पदे रिक्त आहे, पुरूष व महीला आरोग्य सेवक 34, परीचर 10, वाहनचालक 3 अशा महत्वाच्या रिक्त जागांचा त्यात समावेश आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील अन्य दोन तालुक्याचीही स्थिती आरोग्यसेवेच्या बाबतीत जेमतेमच आहे. मारेगाव व झरी दोन्ही तालुके अतिशय दुर्गम आहे हे विशेष. मारेगांव येथे गेल्या काही वर्षापासून एका ग्रामीण रूग्णालयाच्या भरवशावर तेथील आरोग्य सुविधेचा डोलारा उभा आहे. तर झरी तालुक्याची निर्मिती होउन तब्बल 27 वर्षे उलटुनही तेथे ही सेवा जेमतेमच आहे. हे दोन्ही तालुके आदीवासी व दुर्गम असुन झरी तालुका कुमारी माता प्रकरणाने राष्ट्रीय पटलावर आला. मात्र या तालुक्याची परिस्थिती वणी सारखीच असून इथली रुग्णसेवा देखील रेफरच्या सलाईनवरच टिकलेली आहे.

तालुक्यात वणी येथे ग्रामीण रूग्णालय तर राजूर, शिरपूर, कायर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. घोन्सा व तेजापूर येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र ५० हजारांच्यामागे एक शासकीय रूग्णालय अथवा केंद्र असल्याने ही यंत्रणा तोकडी ठरत आहे. तसेच शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टरही उपलब्ध नसल्याने कित्येकदा रूग्णालयातील परिचारिका, आरोग्य सहाय्यकांनाच थातुरमातूर उपचार करून रूग्णांची बोळवण करावी लागते. शासनाने रूग्णालयांना वाहने, औषधी साठ्याची कमतरता ठेवली नाही. मात्र त्याचा वापर करण्यासाठी पुरेसी यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय रूग्णालये केवळ रेफर करणारी केंद्रे बनली आहे.

मोठी व्यापारपेठ, रेल्वे स्थानक, जिनिंग, कोळसा खाणी आदी कारणांमुळे वणी शहराचे जिल्ह्यात महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. शिवाय या परिसरातील आर्थिक उलाढाल ही जिल्ह्यात दुस-या क्रमांकाची आहे. शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यात अन्य ठिकाणीही औद्योगिकिकरण वाढत आहे. त्याचमूळे वाढलेली रहदारी व अन्य कारणांमूळे अपघातांची संख्या देखिल मोठी आहे. शिवाय विविध ऋतूत होणारे आजार, औद्योगिकरणामूळे वाढलेले प्रदूषण आदींचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख नेते हे वणीतच राहतात. काँग्रेस, शिवसेना व आता भाजप या तिन्ही पक्षांनी वणी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र एवढया वर्षात एकही लोकप्रतिनिधींनी आपल्या तालुक्यात चांगली आरोग्य सुविधा देण्याविषयी कुठलेही ठोस पावले उचलले नाही. आणखी किती दिवस आरोग्य सेवा रेफरच्या सलाईनवर राहणार असा प्रश्न सध्या रुग्ण व सर्वसामान्य विचारत आहे. 

Comments are closed.