थरार… चोरट्यांनी लुटले महिलेला, तरुणांचा सिनेस्टाईल पाठलाग

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यात डॉ हाजरा लूटमार प्रकरण ताजे असताना आणखीन एका महिलेला भर रस्त्यात लुटण्याचा थरार आज सोमवारी खैरी जवळ घडला. मात्र खैरी व चिंचमंडळ येथील तरुणांनी सिनेस्टाईल पाठलाग करून यातील एका लुटारूला तालुक्यातील धानोरा रिठ जवळ पकडले. तर दुसरा बंदूकधारी लुटारू पळून जाण्यात यशस्वी झाला. पाठलाग करताना एकाने रिव्हॉल्वर दाखवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे.  

तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कोसारा येथील एक महिला आज सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी बँकेच्या कामासाठी ती वडकी येथे गेली होती. एका ओळखीच्या व्यक्तीच्या मोटारसायकलने ती वडकीवरून कोसारा गावी परत जात होती. दरम्यान दोन इसम त्यांचा दुचाकीने पाठलाग करीत होते. दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास खैरी गावालगतच्या ब्रेकरवर महिलेची गाडी स्लो होताच लुटारुंनी महिलेची बॅग ओढली व पोबारा केला. घटना घडताच महिलेने आरडा ओरड केला. मात्र लुटारू पळून जाण्यात यशस्वी झाले.

सुरू झाला सिनेस्टाईल पाठलाग…. 
आरडाओरड होताच खैरी गावातील एक तरुण ओम भोरे सह काही लोकांनी लुटारुंचा दुचाकीने पाठलाग केला. तर दुसरी कडे महिलेने तात्काळ याची माहिती चिंचमंडळ व कोसारा येथील ओळखीच्या लोकांना दिली. चिंचमंडळ येथील युवक अतुल पचारे याला देखील याची माहिती मिळाली. त्याने आपल्या सवंगडयांना संपर्क साधून चिंचमंडळ जवळचा रस्ता रोखण्यास सांगितले. दरम्यान चोरटे धानोरा रिठ कडे गेल्याची माहिती अतुलला मिळाली.

…अन् लुटारूंनी काढली गन
खैरी येथील तरुण लुटारुंच्या पाठलाग करीत असताना कोसारा रस्त्यावरील दापोरा येथे चोरट्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले व त्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे दोन्ही लुटारू खाली उतरले. त्यातील एकाने खैरीच्या लोकांना रिव्ह़ॉल्वर दाखवली व त्यांना परत जाण्यास सांगितले. पाठलाग करणारे परत जाताना पाहून दोघेही तिथून धानोरा रिठ कडे  पसार झाले. दरम्यान चोरटे धानो-याकडे गेल्याची माहिती मिळताच अतुल पचारे देखील त्या दिशेने गेला. दर दुसरीकडे ओम भोरे हा देखील चोरट्याचा पाठलाग करीत होता.

धानोरा रिठ शिवारात पळून थकल्याने एक लुटारू थांबला व आडोश्याला लपून बसला. दरम्यान तिथे अतुल व ओम हे दोघे पोहचले. त्यांनी लुटारुंना दगडाने मारा केला व बाहेर येण्यास सांगितले. अखेर एक लुटारू शरणागती पत्करत बाहेर आला. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान गावातील इतर लोकही आले. लोकांनी लुटारुची चांगलीच धुलाई केली.

अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव हिरा लिंगाडे (40) असून फरार आरोपीचे नाव खिरटकर असल्याची माहिती आहे. दोघे ही वरोरा येथील रहिवासी आहेत. चोरट्याला पकडून वडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 392 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या आरोपीचा शोध वडकी पोलीस घेत आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जीवाची बाजी लावत लुटारुंना पकड्यास मदत करणा-या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.