घरफोडीच्या सत्राने मारेगाव हादरले, एकाच रात्री चोरट्यांनी फोडले दोन घरं

भास्कर राऊत, मारेगाव: रविवारी रात्री दोन घरफोड्यांनी मारेगाव हादरले. शहरातील वार्ड क्रमांक 5 येथील ओम नगरी येथे या दोन घटना घडल्या. या घरफोडीत एका घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला तर दुस-या घटनेत चोरट्यानी रोख रक्कम लंपास केली. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अनिल डाखरे हे मारेगाव येथील ओम नगरी येथे राहतात. रविवारी रात्री डाखरे कुटुंबीय हे घरी दरवाजे बंद करून झोपले होते. रात्री घरातले सर्व सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी संधी साधुन घरात प्रवेश केला. एका रुममध्ये ठेवलेली पेटी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. त्या पेटीत सुमारे 30 हजार रुपये रोख, सोन्याची एकदानी व कानातील डुल असे सुमारे 25 हजार रुपयांचे दागिने होते. पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

याच रात्री चोरट्यांनी डाखरे यांच्या घराशेजारीच रामेश्वर राऊत राहतात. ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत. ते बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यानी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी खोलीत कागदपत्रांसोबत ठेऊन असलेले 5 हजार रुपये लंपास केले.

गेल्या काही काळापासून वणी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घर बंद असले की फुटले अशी परिस्थिती वणीतील आहे. या एकाही चोरीचा सुगावा लागला नसताना आता मारेगाव देखील चोरट्यांच्या रडारवर आले आहे. भर वस्तीत हा चोरीचा प्रसंग घडल्याने मारेगावकरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा मारेगावकर व्यक्त करीत आहे.

Comments are closed.