शरीर सुदृढ असेल तर देशही मजबूत होतो – आ. बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रतिष्ठित श्री नृसिंह व्यायामशाळा ही फक्त शरीर सुदृढ करणारीच नाही तर उज्ज्वल भविष्य घडविणारी संस्था आहे. व्यायामशाळेत वणीतील मुलीसुद्धा आत्म रक्षणाचे धडे गिरवत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. शरीर फिट असेल तर देशही मजबूत होतो, असे मनोगत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. रविवार 2 जुलै रोजी श्री नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात आयोजित चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

मागील अनेक दिवसांपासून वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. येथील कु. तेजस्विनी राजू गव्हाणे दररोज 80 ते 90 विद्यार्थ्यांना लाठीकाठी, तलवारबाजी, कराटे व मर्दानी आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे. दिनांक 2 जुलै रोजी व्यायाम शाळेच्या पटांगणात चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे , ठाणेदार अजित जाधव, लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, ऍड. निलेश चौधरी, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सुभाष तिवारी, अशोक घुगुल, देवराव गव्हाणे, पुरुषोत्तम आक्केवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मुला मुलींना कौतुकाची थाप देत शुभेच्छा दिल्या.

परिचय : प्रशिक्षक कु. तेजस्विनी राजू गव्हाणे
सामाजिक कार्यकर्ता राजु देवराव गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनी हिला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाडा येथे घेतले. लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी साहसिक खेळात निपुण तेजस्विनी कराटेमध्ये ब्लू बेल्ट धारक आहे.

वणी शहरातील यात्रा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सन 1928 मध्ये श्री नृसिंह व्यायाम शाळा गणेश उत्सव मंडळाची स्थापना झाली होती. त्या कालावधीत मंडळाचे बालाजी चित्तल, विठ्ठलराव कोंडावार, वासूदेव कोंडावार, दुर्लेभदास भाटे, लाभचंद्र काठेड, आप्पाजी देकुलवार, जग्गु आकेवार, आदींनी टप्प्या-टप्प्याने मंडळाचे पद सांभाळले आहे. स्थापनेपासूनच मंडळाने व्यायाम, मैदानी खेळ, कवायतीवर भर दिला आहे. रंगपंचमीच्या मुहूर्तावर खेळण्यात येणारा गुद्दल पेंडी खेळसुद्धा श्री नृसिंह व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळाने चालू केला होता. आजही हा खेळ नित्यनियमाने दरवर्षी खेळला जातो. मुला, मुलींना शारीरिक व्यायाम, लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येते.

हे देखील वाचा: 

रानडुकराचा गुराख्यावर हल्ला, गुराखी जागीच ठार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.