सूडभावनेतून संस्थेला बदनाम करण्याचा खाडे यांचा कट

विवेक तोटेवार, वणी: केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव खाडे यांचे पद गेल्याने त्यांनी संस्थेची बदनामी सुरू केली आहे. ते प्रसारमाध्यमात खोट्या बातम्या पेरून ठेवीदार व कर्जदारांमध्ये गैरसमज पसरवत आहे. असा घाणाघात केशव नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत केला. महादेवराव खाडे यांना पतसंस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आल्याचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांचा हा दावा खोटा आहे. तसेच बँकेच्या सीईओंवर विविध आरोप करताना खाडे यांनी बनावट बँक स्टेटमेंट तयार केले, असा आरोपही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. आज बुधवारी दिनांक 5 जुलै रोजी केशव नागरी सह. पतसंस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. काही दिवसांआधी महादेव खाडे यांनी पत्रकार परिषद घेत पतसंस्थेवर विविध आरोप केले होते. त्याचा खुलासा म्हणून ही पत्रकार परिषद पतसंस्थेच्या संचालक मंडळाद्वारे घेण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल अक्केवार, मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार, संचालक प्रा. गजानन अघळते, विनायक कोंडावार यांची उपस्थिती होती.

प्रा. महादेव खाडे हे केशव नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक व अध्यक्ष होते. मनमानी कारभार, भ्रष्टाचार व संस्थेची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुख्याधिकारी व संचालकांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सूड घेण्याच्या भावनेतून खाडे वारंवार संस्थेविरूध्द पत्रकार परिषद घेऊन खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत. ठेवीदारांच्या भेट घेऊन त्यांना ठेवी काढुन घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कर्जदारांना कर्जाच्या हफ्त्याची परतफेड करू नये असे सांगत आहे. यामागे संस्था बदनाम होवुन बंद पडली पाहीजे असा त्यांचा हेतू आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

प्रा. खाडे वारंवार 1 लाख 45 हजार जिल्हा बँकेत ठेवीबाबत आरोप केशव नागरीतीळ संचालकांवर लावत आहे. संचालकांनी हा आरेप खोडत आयडीबीआय व युनियन बँकेत निधी जमा असल्याचे सांगितले. तसेच गोदावरी अर्बन येथेही 90 लाख रुपये जमा असल्याचा पुरावा दिला. 4 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष चंद्रशेखर खोंड यांनी ठराव घेऊन पैशाची गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेत केला असल्याचेही सांगितले.

खाडे यांनी भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत संस्थेविरोधात विविध तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याच्या चौकशी अहवालात खाडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. तसेच संस्थेच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये सुध्दा संस्थेच्या कारभारात कुठलीही अनियमीतता असल्याचे नमुद नाही. संस्थेची बदनामी केल्या प्रकरणी खाडे यांच्याविरोधात विविध कलमान्वये प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याविरोधात महादेव खाडे यांनी हायकोर्टात दाद मागितली असता त्यावर हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयास पुर्नविचाराकरीता प्रकरण परत पाठविले. मात्र खाडे हे त्यांच्या बाजूने निकाल लागल्याची खोटी माहिती देत असल्याचा दावा देखील संचालक मंडळाने केला आहे.

खाडे यांनी केली पुराव्यात खोडतोड !
पतसंस्थेचे सीईओ दीपक दिकुंडवार यांच्यावर खाडे यांनी विविध आरोप केले आहेत. पत्रकार परिषदतेत त्यांनी पुरावा म्हणून गोदावरी अर्बन बँकेचे स्टेटमेन्ट जोडले होते. मात्र या स्टेटमेंटमध्ये अनेक खोडतोड केली आहे. तसेच त्यावर मारलेला शिक्का व्हाईटनरने खोडला आहे. विशेष म्हणजे ज्या बँकेचे स्टेटमेंट खाडे यांनी जोडले होते. त्या बँकेने देखील हे स्टेटमेन्ट आमच्या बँकेचे नाही, असे पत्र सदर बँकेने दिले असून तो पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. खाडे यांनी अनेक जवळच्या व्यक्तींना कर्जवाटप केले. त्यांच्या मार्फत जे कर्जवाटप झाले आहे. त्यांची अद्यापही वसुली झालेली नाही.

खाडे यांना संस्थेतून काढून टाकल्यानंतर संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज शहरातील मध्यभागी मोक्याच्या ठिकाणी संस्थेच्या मालकीची चार माळ्याची बिल्डिंग आहे. तसेच संस्थेकडे सुमारे 100 कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेची होत चाललेली प्रगती ही ते संस्थेत नसताना झाल्याने ते संस्थेची बदनामी करीत आहे. खाडे यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून ठेवीदारांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पत्रकार परिषदतेतून संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.