ब्रेकिंग – लाखो रुपयांचा सुगंधित (प्रतिबंधित) तंबाखूचा साठा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात यवतमाळहून विकण्यासाठी आणलेला सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून सुमारे सव्वा लाखांचा तंबाखू व सुमारे 3 लाखांचे मालवाहू वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी दिनांक 19 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुगंधी (प्रक्रिया केलेला) तंबाखूची विक्री करण्यास मज्जाव असून शहरात मोठ्या प्रमाणात याची विक्री होते. खर्र्यामध्ये याचा वापर होतो. याआधी अनेकदा पानटपरीचालकावर कारवाई व्हायची. मात्र यावेळी त्यांना पुरवठा करणा-यावर कारवाई झाली आहे.  

जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व आळा घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .पवन बनसोड यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिले आहे. आदेशाच्या अनुषंगाने गुरुवार 19 जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पोलीस वणी शहर हद्दीत अवैध धंद्यावर धाड, गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. दरम्यान पथकास विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की शहरातील आदर्श शाळेजवळ एका मालवाहू वाहन प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरून उभा आहे.

मिळालेल्या माहिती वरून एलसीबी पथकाने मालवाहू वाहन क्रमांक MH 29 BE 4755 ची पंचासमक्ष झडती घेतली असता वाहनात तीन खोक्यात मजा सुगंधित तंबाखूचे 200 ग्राम वजनाचे 120 डब्बे आढळून आले. सदर मालवाहू वाहनाचे चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव शंकर बाबाराव खोडे (54) रा. कात्री, ता. कळंब असे सांगितले.

तसेच वाहनातील प्रतिबंधक तंबाखू यवतमाळ येथील शैलेश गाडेकर यांच्या मालकीचा असून त्याच्या सांगण्यावरून वणी शहरात विक्री करिता आणल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी वाहनातील तंबाखू किंमत 1 लाख 12 हजार 700 व मालवाहू वाहन किंमत 3 लाख असे एकूण 4 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी वाहन चालकाला अटक केली.

सुगंधीत तंबाखूचा साठा करून बाळगल्या प्रकरणी– शंकर बाबाराव खाडे (54) रा . कात्री, ता. कळंब व शैलेश गाडेकर, रा. यवतमाळ याचेविरूध्द पुढील कारवाई करण्याकरिता अन्न व औषधी प्रशासन, विभाग यवतमाळ येथील अधिकाऱ्यांना पाचारण केले. फिर्यादी घनश्याम दंदे, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांचे फिर्याद वरून आरोपी विरूद्ध शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू बाळगल्या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे भादंवि व अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियमन 2011 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मुडे, पोहवा सुनील खंडागळे, योगेश डडवार, सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.