एकीकडे उपोषण, तर दुसरीकडे खंडणी मागितल्याच्या क्लिप व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात अविकसित बाळ प्रकरणी डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बाळाच्या नातेवाईकांनी शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. महेंद्र लोढा यांनी बाळाचे पालक बदनामी व कारवाईची भीती दाखवत ब्लॅकमेलिंग करून 25 लाखांची मागणी करीत असल्याचा दावा केला आहे. या बाबत त्यांनी काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.

सविस्तर वृत्त असे की भाग्यश्री नरेंद्र बुजाडे या वणीतील भगतसिंगनगर कनकवाडी येथील रहिवासी आहे. 28 जुलै रोजी त्यांची वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र प्रसूत झालेल्या बाळाचे काही अवयव अविकसित होते. डॉ. लोढा यांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या वाढीबाबत पुरेशी माहिती दिली नाही. त्यामुळे अवयव अविकसीत झालेले बाळ जन्माला आले, असा आरोप नवजात बाळाच्या पालकांनी केला होता.

गुरुवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर प्रकरण चांगलेच तापले. बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन बाळाचे पोस्टमॉर्टम करण्याची मागणी लावून धरली होती. पोस्टमॉर्टम नंतर बाळाच्या नातेवाईकांनी लोढा हॉस्पिटलसमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली होती. अखेर शुक्रवारी दिनांक 1 सप्टेंबर पासून बाळाच्या नातेवाईक तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

25 लाखांची मागणी !
या प्रकरणी शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी डॉ. महेंद्र लोढा यांनी सोशल मीडियातून एक आवाहन व्हायरल केले. त्यासोबत त्यांनी काही ऑडिओ क्लिप देखील जोडल्या. प्रकरण थांबवण्यासाठी बाळाच्या पालकांनी 25 लाखांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या पोस्टमधून केला. तसेच या प्रकरणी शहरातील काही तथाकथित समाजसेवक हात धुवून घेत असून मला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये?
डॉ. लोढा यांच्याद्वारे व्हायरल करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये एक महिला मारेगाव येथील एका महिलेशी संवाद साधत असून त्यात ती 25 लाख दिल्यास आम्ही वणीतून निघून जाऊ. पैसे न दिल्यास आम्ही हे प्रकरण वर पर्यंत नेऊ अशी बोलत आहे. तसेच पैसे न दिल्यास आम्ही मागे लावलेले लोक डॉक्टरांची हजामत करणार असा संवाद देखील एका क्लिपमध्ये आहे.

दुस-या क्लिपमध्ये एक महिला आधी मध्यस्थीशी व नंतर डॉक्टर लोढा यांच्याशी बोलत आहे. यात ती महिला 25 लाखांची मागणी करीत आहे. आज संध्याकाळी 8 पर्यंत पैसे न दिल्यास उद्यापासून याचे तीव्र पडसाड पडणार असा संवाद साधत आहे. संवादात डॉक्टर लोढा हे बाळाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयार बोलून दाखवत आहे. मात्र महिला 25 लाखांवर ठाम असून होणा-या परिणामास तयार राहावे असे बोलताना दिसत आहे.

डॉ. महेंद्र लोढा यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये अनेक खळबळजनक दावे केले असून त्यांनी या प्रकरणाच्या मागे शहरातील काही तथाकथित समाजसेवक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यातील एक समाजसेविकेने मध्यस्थीद्वारा 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा देखील केला आहे. तसेच बाळाला एक महिना उपचाराविना ठेवल्याने नवजात बाळाचा मृत्यू हा जंतू संसर्गाने झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.