आरोपी समीरच्या गुन्ह्यात वारंवार वाढ, शहरात विविध चर्चेला उधाण

दरोडा व आर्म्स ॲक्टचे कलम खोटे, रफिक रंगरेज यांचा पोलिसांवर आरोप

विवेक तोटेवार, वणी: संपत्तीच्या वादातून फर्निचरचे दुकान जेसीबीच्या साहाय्याने पाडणारा आरोपी समीर रंगरेज व त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत बुधवारी आणखी दोन दिवसांची वाढ झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तलवार जप्त करण्यात आल्याचा दावा करून त्याच्यावर शस्त्र प्रतिबंधक कलम 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी न्यायालयासमोर हाच मुद्दा मांडून पुन्हा दोन दिवसांची कोठडी मिळविली. सोमवारी सर्व आरोपींवर दरोड्याची कलम लावण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा कलमांत वाढ करण्यात आली. पोलिसांकडून आरोपीच्या गुन्ह्यात वारंवार वाढ केल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आरोपी समीरचे वडील व सामाजिक कार्यकर्ते रफिक रंगरेज यांनी पोलिसांनी लावलेले वाढीव कलमं हे खोटे असून हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनातून केली. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. 

रफिक रंगरेज यांनी निवेदनात म्हटले आहे की ज्या संपत्तीबाबत वाद आहे सदर जागा ही समीर रंगरेजने विकत घेतली आहे. सदर जागेबाबत केळापूर न्यायालयाने 27 मार्च 2015 रोजी आदेश पारित करून पंकज भंडारी यांनी दोन महिन्यात सदर जागा रिकामी करून देण्याचा आदेश दिला होता. या प्लॉटची मोजणी देखील पोलीस संरक्षणात झाली. त्यानंतर समीर यांनी त्यांच्या हद्दीतील नवीन बांधकाम करण्यासाठी जुने व पडके बांधकाम पाडले.

पंकज भंडारी यांनी दुकान फोडल्याची खोटी तक्रार दिली आहे. त्यांचे नवकार फर्निचर हे दुकान अजूनही शाबूत आहे. असा दावा रफिक रंगरेज यांनी केला असून या प्रकरणी दरोडा व शस्त्र हे अधिकचे लावण्यात आलेले कलमं हे खोटे असून हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. निवेदनात रफिक रंगरेज यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या परिचितांच्या सही आहे.

दुकान पाडल्याची घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही काही लोकांकडून करण्यात आला. यावरून धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता दिसताच समीर रंगरेजचे वडील रफिक रंगरेज यांनी त्यांच्या मुलाच्या कृत्याचा निषेध करीत हा दोघांमधला संपत्तीचा वाद असून याला धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन केले होते.

समीर रंगरेज व त्याच्या साथीदारांवर चार दिवसात सलग दोनदा गुन्ह्यात वाढ करण्यात आली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच वारंवार होणा-या गंभीर कलमांमुळे यात कुणी पडद्यामागे सूत्रधार तर नाही? अशी चर्चा देखील शहरात सुरू आहे. जर असे काही असल्यास त्यामागचा ‘सूत्रधार’ आणि पोलिसांचा ‘बोलविता धनी’ कोण? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.