केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शाखा अध्यक्ष, सचिव व कार्यकारी अधिका-याविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी दुपारी करणवाडी येथे केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचा-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मिळालेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी शाखा अध्यक्ष, सचिव व कार्यकारी अधिका-याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही काळापासून केशव नागरी ही पतसंस्था दोन गटातील वादामुळे चर्चेत होती. त्यातच आता एका कर्मचा-याच्या आत्महत्येमुळे व या प्रकरणी संस्थेच्या तिघांवर गुन्हा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

तक्रारीनुसार, मृतक लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर (42) हे करणवाडी येथील मुळचे रहिवासी होते. ते मारेगाव येथे कुटुंबीयांसह राहायचे. ते केशव नागरी सहकारी पतसंस्थेत लिपिक पदावर कार्यरत होते. काही दिवसांआधीच त्यांची आर्णी येथे बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ते मारेगावहून पत्नीसह करणवाडी येथे त्यांच्या जुन्या घरी आले. त्यांनी पत्नीला शेताच्या कामासाठी जाण्यास सांगून घराची साफसफाई केल्यानंतर ते मारेगाव येथे परत जाणार, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नी करणवाडी शेतशिवारातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या.

दुपारी 4 वाजताच्या सुमारास गावातील काही लोकांना सीदूरकर यांच्या घरासमोरील विहिरीच्या जवळ कपडे व चप्पल आढळून आली. त्यामुळे लोकांना कुणीतरी विहिरीत उडी घेतल्याचा संशय आला. त्यामुळे विहीरीजवळ लोकांची एकच गर्दी झाली होती. याच सुमारास लक्ष्मण यांच्या पत्नी घरी आल्या. त्यांना विहीरीबाहेर असलेले शर्ट त्यांच्या पतीचे असल्याचे लक्षात आले.

आत्महत्येच्या संशयामुळे लोकांनी गळ टाकून चाचपणी केली असता त्यांना लक्ष्मण यांचा मृतदेह गवसला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. लक्ष्मण यांनी विहिरीत उडी घेण्याआधी घरातील बंगईवर गळ्यातील चैन, पैसे, चश्मा व दोन चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. या सुसाईड नोटमध्ये तीन लोकांची नावे आढळून आली. 

या प्रकरणी लक्ष्मण सीदूरकर यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून केशव नागरी पतसंस्थेचे शाखा अध्यक्ष चंद्रशेखर खोंड (60), शाखा सचिव अनिल अक्केवार (40) व कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार (42) यांच्या विरोधात रात्री उशिरा भादंविच्या कलम 306 व 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

 

काय आहे वाद?
मृतक लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर हे वणी येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेत लिपिक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना पांढरकवडा येथे व्यवस्थापक पदावर बढती मिळाली. मात्र काही महिन्याआधी त्यांचे पुन्हा लिपिक पदावर डिमोशन करण्यात आले व त्यांची आर्णी येथील शाखेत बदली करण्यात आली. मात्र त्यांनी बदली रद्द करून वणी किंवा पांढरकवडा शाखेत ठेवावे अशी विनवणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. बदली झाल्यानंतर ते तणावात होते व त्यांनी आर्णी शाखेतील नोकरी जॉईन देखील केली नव्हती. त्यांना ट्रान्सफर थांबवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याच तणावातून व मानसिक त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या पत्नी रुपाली सीदूरकर यांनी केला आहे.

गेल्या काही काळापासून केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील संचालक मंडळातील दोन गटातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता एका कर्मचा-याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक लक्ष्मण यांच्या पश्चात आईवडील, पत्नी रुपाली दोन मुले असा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.