गुजरात येथील बनावट डिझेल वणीत ! 21 लाखांचे बनावट डिझेल जप्त

4 जणांवर गुन्हा दाखल, ट्रान्सपोर्टच्या वाहनात बनावट डिझेलचा वापर?

वणी बहुगुणी डेस्क, वणी: गुजरात येथून वणी तालुक्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत आलेले बनावट डिझेल वणी पोलिसांनी धाड टाकून जप्त केले. सदर साठा हा 21 लाखांचा असून या प्रकरणी चालकासह 4 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यातच बनावट डिझेल सापडल्याने ट्रान्सपोर्टच्या वाहनात बनावट डिझेलचा वापर तर होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. 

सविस्तर वृत्त असे की दिनांक सोमवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी वणी पोलिसांना हिलटॉप हायराईन कंपनी कोलारपिंपरी, ता. वणी येथे एका टँकरमध्ये (GJ12 CT0731) बनावट डिझेल (डिझेल सदृष्य द्रव्य) असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास धाड टाकत सदर वाहन ताब्यात घेतले. पुरवठा अधिका-यांच्या पथकाने या वाहनाची तपासणी केली. गाडीचा चालक विजय रामजीत यादव (27) रा. दोसपूर जिल्हा आंबेडकर नगर उत्तर प्रदेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

चालकाने टँकरमध्ये 30 हजार लिटर डिझेल असल्याचे सांगितले. तसेच हे डिझेल कांडला गुजरात येथून आणल्याची माहिती त्याने दिली. चालकाने याची जीएसटी पावती व इंडस्ट्रीअल यूज ओन्ली असा कागद देखील दाखवला. मात्र सदर डिझेल हे भेसळ, बनावट असल्याचा संशय पुरवठा अधिका-यांना आला. त्यामुळे त्यांनी डिझेल असल्याचे कागदपत्र चालकाकडे मागितले, मात्र त्याच्याकडे ते आढळून आले नाही. तसेच पुरवठा अधिका-याना सदर डिझेल हे बनावट असल्याचा संशय आला.

आवश्यक कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी सदर टँकर (किंमत 15 लाख) व बनावट डिझेल (किंमत 21 लाख) असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विजय रामजीत यादव रा. उत्तरप्रदेश व 3 अनोळखी आरोपी अशा एकूण 4 आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमच्या कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वणी पोलीस व पुरवठा विभागाच्या अधिका-यांद्वारा करण्यात आली. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

ट्रान्सपोर्टच्या वाहनात बनावट डिझेलचा वापर?
हिलटॉप हायराईन कंपनी ही एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीत हा बनावट डिझेलचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे सदर साठा हा फक्त इंडस्ट्रीअल यूज साठी असल्याचे कागदपत्रात म्हटले आहे. त्यामुळे हा साठा ट्रान्सपोर्टच्या वाहनात तर वापरला जात नव्हता? असा सवाल या प्रकरणी उपस्थित होत आहे. आधीच परिसर प्रदूषणाने ग्रस्त आहे. त्यात जर वाहनात बनावट डिझेलचा वापर होत असल्यास ही एक गंभीर बाब आहे. 

सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.