निकेश जिलठे, वणी: जोपर्यंत एकही मराठी माणूस जिवंत राहिल तो पर्यंत मराठी साहित्य जिवंत राहिल. मराठी मन अतिशय संवेदनशील साहित्यात, गाण्यात रमणारे आहे. भारताच्या समृद्ध संस्कृतीला मराठी साहित्याने जपले आहे. जेवढी साहित्य संमेलन मराठी भाषिकांचे होतात त्यात मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला येतो त्यातून त्याचे संवेदनशील मन कळते. असे विचार 66 व्या विदर्भ साहित्य संमलनाच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता वणीतील राम शेवाळकर परिसरात 66 व्या अखिल भारतीय विदर्भ मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त होते. तसंच खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार समारोहात हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी केवळ वणीकरच नाही तर राज्यभरातून साहित्य प्रेमी हजर होते.
साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी केले. तर या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. स्वागताध्यक्षपर भाषणात ते म्हणाले की वणीला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक मोठे साहित्यिक आणि पत्रकार वणीने महाराष्ट्राला दिले आहे. लोकनायक बापुजी अणे, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, वसंता आबाजी डहाके, गौतम सुत्रावे, लक्ष्मिकांत घुमे ते आजचे दिलिप अलोणे आणि माधव सरपटवार पर्यंत अशा अनेक साहित्यिकांचा वारसा वणीला लाभला आहे. अशा या वणीत साहित्य संमेलन होत असल्याचा मला आनंद होत आहे.
या वेळी प्रमुख अतिथी असलेले खासदार हंसराज अहिर म्हणाले की साहित्य हा समाज आणि संस्कृतिचा आरसा असतो. साहित्य हे समाज घडवण्याचे काम करते. ही प्रथा प्राचिन काळापासून सुरू आहे. परदेशी राजे हे आमचे कधीच आदर्श होऊ शकत नाही. शिवाजी महाराज, पृथ्वीराज चौहान हे राजांना आम्ही मानत असून साहित्यातून परदेशी राजांचे उदात्तीकरण थांबले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शिरीष देशपांडे म्हणाले की आज नवीन मुले मोबाईल आणि व्हिडीओ गेममध्ये रमतो. तरुणांच्या हाती आता पुस्तकांऐवजी स्मार्टफोन आणि व्हिडीओ गेम दिसतो. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकर जनता सहभागी होती. शिवाय फक्त साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी दुरदुरूनही अनेक रसिकांनी हजेरी लावली होती. मान्यवरांचा फुल आणि बुके देण्याऐवजी ग्रामगिता देऊन स्वागत करण्यात आले. जयंता कुचनकर आणि चमुने स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत अणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कासावार यांनी केले.