मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीसाला हृदयविकाराचा धक्का
वणी, रवि ढुमणे: विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वणीत उदघाटन करण्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी वडकी पोलीस ठाण्यातून येणाऱ्या रमेश पिदूरकर या पोलीस शिपायाला हृदय विकाराचा धक्का आला आहे. दरम्यान पोलीस शिपायाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
आज दुपारी 12 वाजता वणीतील राम शेवाळकर परिसरात 66 व्या अखिल भारतीय विदर्भ मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त होते. तसंच खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार समारोहात हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी केवळ वणीकरच नाही तर राज्यभरातून साहित्य प्रेमी हजर होते. साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी केले. तर या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकर जनता सहभागी होती. शिवाय फक्त साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी दुरदुरूनही अनेक रसिकांनी हजेरी लावली होती. मान्यवरांचा फुल आणि बुके देण्याऐवजी ग्रामगिता देऊन स्वागत करण्यात आले. जयंता कुचनकर आणि चमुने स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत अणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कासावार यांनी केले.