शिक्षण आणि साहित्य क्षेत्र स्वायत्त असले पाहिजे: गडकरी
वणी (राम शेवाळकर परिसर): समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्यामुळेच या व्यक्तींचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी स्व. धु. गो. उपाख्य बाबासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आशुतोष शेवाळकर, दैनिक ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे, श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रकाश एदलाबादकर, विलास देशपांडे, वामन तेलंग, शुभदा फडणवीस, गजानन कासावार, ॲड. देवीदास काळे, डॉ. भालचंद्र चोपणे, माधवराव सरपटवार, नरेंद्र नगरवाला, डॉ. दिलीप अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की शिक्षण आणि साहित्य क्षेत्र हे स्वायत्त असले पाहिजे. मराठी साहित्य खूप मोठे आहे. विदर्भात साहित्य संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. पसे मिळवल्याने सुख मिळत नाही, तर सुख एखादे चांगले पुस्तक वाचल्याने हमखास मिळते. त्यामुळे मानवी जीवनात पुस्तकाचे वा साहित्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यिक, लेखक, कवी यांच्या लेखणीतून निघणारे शब्द राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगी पडतात. साहित्यिकांनी लिहिलेच पाहिजे तसेच साहित्यिकांमध्ये मनभेद होता कामा नये.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाखाध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वानंद पुंड यांनी तर आभार राजाभाऊ पाथ्रटकर यांनी मानले.