वणीतील रस्त्यांसाठी 20 कोटी मंजूर: गडकरी

0

वणी: रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वणी येथे राष्ट्रीय महामार्ग 930, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय व्यवस्थापक एम. चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी उपस्थित होते.

यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. शेतीमध्ये नवनवीन संशोधनाची गरज आहे. शेतउत्पादनावर भविष्यात पेट्रोल, डिझेल, गॅस निर्माण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पराट्या, तुराट्या, ज्वारीचे फड, सोयाबीनचे कुटार आदी बायोमासपासून सेकंड जनरेशन इथेनॉल आणि बायो सीएनजी तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

बांबूपासून शर्ट, फर्निचर, लोणचं, पेपर, प्लायवूड आणि बायो इथेनॉल तयार करता येते. त्यामुळे बांबुची लागवड करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बांबु आता गवत या प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे बांबु तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. बायोसीएनजीसारखे प्रकल्प यवतमाळ-वणी भागात सुरू करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेतील कंपनीच्या सहाय्याने भद्रावतीला कोळशापासून युरिया तयार करण्याचे तंत्रज्ञान आणले आहे. वणी भागात कोळसा असल्यामुळे येथे मिथेनॉलचे उद्योग उभे राहू शकतात. राज्यातील जलसंवर्धनाबाबत श्री. गडकरी म्हणाले, सिंचनासाठी राज्याला 1 लक्ष कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रकल्प आहे. भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ब्रीज कम बंधाऱ्याची काम हाती घ्यावी. यवतमाळमध्ये सेंद्रीय शेतीची कामे चांगली आहे. त्यासाठी नवनवीन संशोधन समजून घेण्याची गरज आहे. शेतीवरचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात विविध क्षेत्रात एकूण 5 लक्ष कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार सुरेश धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा जिल्ह्यातील वणी येथील राष्ट्रीय महामार्ग 930 वर वरोरा ते वणी एकूण 18.31 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा टप्पा वरोरापासून 313.850 किमी ते 332.160 किमी पर्यंतचा आहे. या महामार्गाचे कामकाज ईपीसी म्हणजेच इंजिनीअरींग खरेदी आणि बांधकाम या तत्वावर करण्यात येणार आहे. चार पदरी असणाऱ्या या महामार्गासाठी एकूण 584.58 कोटी निधी लागणार असून भुमी अधिग्रहणासाठी 312.69 कोटी असे एकूण 904.25 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. याअंतर्गत वर्धा नदीवरील एक मोठा पुल, तीन लहान पुल, वरोरा बायपासवर एक रेल ओव्हरब्रिज, जांब ते चंद्रपूर वाहतूक अबाधित राहावी यासाठी वरोरा बायपासच्या आरंभ बिंदुजवळ एक उड्डाण पूल प्रस्तावित आहे. (साभार- महान्यूज)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.