नेक डॉक्टर… शेख डॉक्टर !

0
Sagar Katpis

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘दवा भी न लगे, दुवा भी न लगे यह मोहब्बत की किसी को हवा भी न लगे’’ जवळपास प्रत्येकालाच माहीत असलेला हा शेर आहे. डॉ. एन. सी. शेख ह्यांच्या पेशंटस्चा अनुभव आहे की त्यांची ‘‘दवा’’ जेवढं काम करते, तेवढीच त्यांची दुवादेखील. पेंशट आणि डॉक्टर यांच्यातील विश्वास आणि आपुलकीचाही ते ‘‘दुवा’’च आहेत.

जन्माला आलं की व्याधी, आजार आणि बरंचकाही लागूनच येतं. अगदी सर्दी, पडसं, ताप, खोकल्यापासून तर अॅक्सिडेंट आणि इमरजंसीत डॉक्टरच आपले प्राणदूत असतात. याला अलीकडे ‘‘वैद्यकीय व्यवसाय’’ म्हणतात. पण जुन्या डॉक्टर्सनी व्यवसायाऐवजी रुग्णसेवाच केली. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या ‘‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’’ या उक्तीप्रमाणेच डॉ. शेख यांनी त्यांच्या कादकीर्दीत लाखों रुग्णांना सेवा दिली.

नूर मोहंमद शेख चांद हे त्यांचं पूर्ण नाव. 11 नोव्हेंबर 1938ला त्यांचा जन्म झाला. 60च्या दशकात त्यांनी पटवारी म्हणून काम केलं. त्यावेळी कूळकायदावगैरे होता. नंतर त्यांचं हे काम बंद झालं. पुढे त्यांनी यवतमाळ येथे 1968ला डिप्लोमा ईन होम्योपॅथी अॅण्ड बायोकेमिक केलं. पदविका मिळाल्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात डॉ. कपले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं. त्यानंतर जवळपास त्यांनी 50 वर्षे सातत्याने रुग्णसेवा केली. वणीतील नटराज चौक ते संत गाडगेबाबा चौक मार्गावर त्यांचा दवाखाना सुरू झाला. तो आजही अनेकांसाठी आशेचा किरण म्हणून दिमाखात उभा आहे. अहोरात्र सेवा देणारे शेख डॉक्टर आता थकले. ते आता रुग्णसेवा देत नाहीत. पण त्यांचे सगळ्यात लहान चिरंजीव डॉ. नईम आता त्यांचा रुग्णसेवेचा वारसा चालवीत आहेत.

शेख डॉक्टर ह्यांना एक मुलगी व तीन मुलगे. मुलगी विवाहित़. मोठा जावेद, मधला सलीम तर सगळ्यांत लहान डॉ. नईम. आजही हा सर्व परिवार एकत्र राहतो. डॉक्टरांचे चालणे, फिरणे सध्या बंद आहे. संपूर्ण परिवार त्यांची काळजी घेतो. रोज त्यांना भेटायला त्यांचे अनेक चाहते येतात. 25 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी मा. नादिया बेगम ह्यांचे निधन झाले. ती आठवण काढताना ते अत्यंत भावूक झालेत. कुणाला कधीच दुखवू नका असे ओल्या स्वरांत ते बोलून गेले. घरात नातवंड खेळतात. डॉक्टर त्यांच्याच रमतात.

याही वयात त्यांची ऊर्जा कायम आहे. श्रवणशक्ती कमी झाली त्यांची. थोडं विस्मरण होतं; पण त्यांच्याशी जुळलेली माणसं त्यांना लक्षात राहतात. आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाकडे गेल्यावर जेवढी आस्थेने विचारपूस होते, तेवढीच डॉक्टर आजही करतात. त्यांचा प्रचंड लोकसंग्रह आहे.  दिवाळीला फराळाचा, ख्रिसमस्ला केक्सचा व अनेक लोकांसह विविध सण व उत्सवांमध्ये त्याचा आपुलकीने सहभाग असायचा. सगळ्यांच्या सुख-दुःखात ते सहभागी व्हायचे. त्याही आठवणीत ते रमतात. प्राचार्य राम शेवाळकर यांचे चिरंजीव आशुतोष आणि वणीतील उद्योजक रतनलाल जयस्वाल यांची मुलगी मनीषा यांच्या लग्नातील पुरणपोळीचा घेतलेला आस्वाद त्यांनी तेवढ्याच उत्साहाने सांगितला. जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत याही पलीकडे त्यांनी माणुसकी जोपासली. सगळ्यांना आपलं केलं. त्यांच्या वैद्यकीय सेवेतही ते आपुलकीनेच विचारपूस करीत असतात. शेख डॉक्टरांकडूनच औषधी पाहिजे हा त्यांच्या पेशंटस्चा आग्रह असायचा.

संपूर्ण वणी, मारेगाव, झरी या तिन्ही तालुक्यात त्यांचे चाहते आहेत. औषंधांसोबत पाठीवर धीराचा ठेवलेला हात आणि प्रेमाचे मधुर बोल हे त्यांच्या ट्रिटमेंटचं कॉम्बिनेशन होतं. वणीत एकेकाळी डॉक्टर्स फारच कमी म्हणजे बोटांवर मोजण्याइतकेच होते. शेख डॉक्टरकडेही गर्दी असायची. मात्र एवढ्या गर्दीतही पेशंटची ‘‘हिस्ट्री’’ त्यांच्या लक्षात राहायची. ती हिस्ट्री केवळ आजाराचीच नसायची. त्याचं आर्थिक, सामाजिक, भावनिक वगैरे सगळंच बॅक्ग्राउंड शेख डॉक्टरांना माहीत असायचं.

मी स्वतः लहानपणी अनेकदा अनुभवलेले प्रसंग आहेत. अत्यंत गरीब एखादा पेशंट फीज द्यायला खिशात घात घालतो. डॉक्टर त्यांच्याकडे पाहतात. डॉक्टर शेख त्याचा हात हातात घेतात. डोळ्यांनीच बोलतात. त्यांच्या स्पर्शाची ऊब थेट पुढील माणसाच्या काळजातून त्याच्या डोळ्यांत जाऊन उसळते. त्यांने कितीही प्रयत्न केला तरी पापण्यांची थरथर ती व्यक्ती थांबवू शकत नाही. दोन थेंब डोळ्यांतून डॉक्टरसाहेबांच्या हातांवर पडतात. ते थेंबच फीज असते. दवा पेशंटला लागू पडते…. दुवा शेख डॉक्टरच्या कर्तृत्वाला… निरामय आर्युआरोग्यासाठी डॉ. एन. सी. शेख ह्यांना सदिच्छा!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!