रुद्राक्ष उद्यान वणीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख देणार – सुधीर मुनगंटीवार
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले रुद्राक्ष वन उद्यानाचे भूमिपूजन
बहुगुणी डेस्क, वणी: पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. निंबाळा सारख्या निसर्गीक देणगी लाभलेल्या या परिसरातील 15 हेक्टरमध्ये जे रुद्राक्ष वन तयार होणार आहे, त्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. हे वन पर्यटणाचं केंद्र बनणार तसेच हे उद्यान बालगोपाळांपासून सर्वांनाच आनंद देणारं ठरेल, उद्यान तयार झाल्याने येथे स्थानिक लोकांना रोजगारही मिळणार आहे. रुद्राक्ष उद्यानामुळे वणीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळणार अशी, आशा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रुद्राक्ष वनाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी एक महिन्यापूर्वी शिवपुराण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येथे आले असता त्यांनी रुद्राक्ष वन उभारण्याचे आश्वासन दिले होते. एका महिन्यात सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून गुरुवारी या रुद्राक्ष वनाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वनात रुद्राक्ष, बेल आदींसह विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, निसर्ग व पर्यावरण विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महीप गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्यानामुळे वणीला नवीन ओळख मिळेल असे मनोगत आ. धुर्वे यांनी व्यक्त केले. पर्यटन मंडळाचे संचालक महीप गुप्ते यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक रवी बेलूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, विनोद मोहितकर, संजय पिंपळशेंडे, जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.