धुळवडीच्या दिवशी नदीत आंघोळीला गेलेला तरुण गेला वाहून

एकुलता एक मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ

वणी बहुगुणी डेस्क: धुळवडीला मित्रांसह नदीवर पोहायला गेलेला एक तरुण वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला. धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण गजानन बाजन्लावार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या काही मित्रांसह मुकुटबन पासून चार किलोमीटर दूर असलेल्या पैनगंगेच्या पात्रात पोहायला गेला होता.

Podar School 2025

प्राप्त माहिती नुसार, प्रवीण गजानन बाजन्लावार (22) हा मुकुटबन येथील रहिवासी आहे. सोमवारी दिनांक 25 ला धुळवडीच्या दिवशी तो मित्रांसह रंग खेळला. त्यानंतर तो मित्रांसह मुकुटबनपासून दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीवर आंघोळीला गेला होता. काहीजण आंघोळ करून बाहेर आले, मात्र आंघोळ करता करता पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवीण नदीच्या प्रवाहात वाहून गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही बाब सोबतच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुकुटबन येथे येऊन गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रवीणचे नातलग व गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नदीपात्रात त्याचा शोध घेतला असता, दोन तासानंतर परसोडा गावाच्या नदीतीरावर प्रवीणचा मृतदेह हाती लागला.

परसोडा हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिस ठाण्यांतर्गत येणारे गाव आहे. त्यामुळे कोरपना पोलिस घटनास्थळी आले. या घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना दिल्यानंतर मुकुटबन पोलिसही घटनास्थळी पोहोचले. कोरपना येथे मंगळवारी शवविच्छेदन करून मृतदेह मुकुटबन त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत प्रवीण हा एकुलता एक मुलगा होता. प्रवीणच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.