चोरट्यांनी पळवले चक्क पिकअप वाहन

दुचाकी चोरीनंतर मोठे वाहन चोरट्यांच्या रडारवर

विवेक तोटेवार, वणी: घरफोडी, दुचाकी चोरी नंतर आता चोरट्यांनी चक्क पिकअप वाहनावर हात साफ केला आहे. 24 एप्रिल च्या रात्री चिखलगाव येथे ही घटना घडली. गाडी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या चोरीच्या घटनेमुळे वणीकर त्रस्त झाले आहेत. मात्र चोरट्यांचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. 

प्रवीण कुमार खंडे (37) हे चिखलगाव येथील मारोती टाऊनशिप येथे राहतात. यांच्याकडे दोन महिंद्रा पीकअप वाहने (MH29AT 0924, MH29BE 4256) आहे. गाडी चालवण्यासाठी त्यांनी चालक ठेवले आहेत. हे दोन्ही चालक मागील 7 वर्षांपासून यांच्याकडे काम करतात.

सकाळी 9 वाजता ते गाडी घेऊन जातात. सायंकाळी काम झाल्यावर गाडी बिल्डिंग खाली ठेवतात आणि घरी निघून जातात. गाडीची एक चावी चालकाकडे व एक चावी मालकाकडे असते. 24 एप्रिल रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे गाडी लावून चालक घरी निघून गेले. 25 एप्रिलला सकाळी 8 वाजता प्रवीण यांनी जाऊन बघितले असता यातील एक वाहन (MH29AT 0924) ज्याची किंमत 2 लाख 60 हजार हे दिसले नाही.

त्यांनी फोन करून चालकांना विचारणा केली. पण त्यांनी संध्याकाळी वाहन बिल्डिंगखाली ठेवल्याचे सांगितले. गाडी मालकाने चालकासह वाहनाचा शोध घेतला. मात्र वाहन आढळून आले नाही. अखेर त्यांनी वणी पोलीसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.