विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडवरील गौरकार कॉलोनीकडे जाणा-या मार्गावर असलेल्या एका बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा झाला. यात एक गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तिन तरुणांवर गुन्हा दाखल केला.
सोमवारी दिनांक 13 मे रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलिसांना वरोरा रोडवरील गौरकार कॉलोनीकडे जाणा-या एका बारमध्ये राडा झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून ते घटनास्थळी गेले असता बार समोर त्यांना काही लोक एकमेकांना शिविगाळ करीत आपसात मारामारी करताना आढळले. पोलिसांनी विचारपूस केली असता सदर राडा हा दारू पिण्याच्या बील देण्यावरून झाल्याचे त्यांना कळले.
दादागिरीला आळा कधी?
दर एक-दोन महिन्यात बारमध्ये छोटा मोठा राडा झाल्याच्या घटना समोर येतात. दारूची झिंग चढली की टपोरींची भाई बनूण बारमध्ये दादागिरी सुरु होते. काही वेळा मालक, मॅनेजरशी तर कधी शेजारी टेबलवर असलेल्यांशी वाद झाल्याने राडा होतात. मॅनेजरशी किंवा वेटरशी वाद विकोपाला गेला तर सर्व कर्मचारी शटर खाली करून अशा भाईंना चांगलाच प्रसाद देतात. मात्र शेजारच्या टेबलवर किंवा आपसात वाद झाल्यास बार कर्मचारी राडा करणा-यांना बार बाहेर हाकलून लावतात. मात्र त्यानंतर हा वाद बार समोर सुरु असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींविरोधात भादंविच्या कलम 160 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. पोलिसांनी भाईगिरीला आळा घालावा अशी अपेक्षा वणीकर करीत आहे.
Comments are closed.