विवेक तोटेवार, वणी: पळसोनी फाट्याजवळील गोदाम मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला आहे. तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांनी 3 आरोपींना कारंजा (लाड) येथून अटक केली. यात एक अल्पवयीन मुलाचाही (विधीसंघर्षग्रस्त) समावेश आहे. अजीम शहा रमजान शहा (35) रा. नुसनगर, मोहम्मद उमर अब्दुल गणी (36) रा. बेबी सालपुरा, व एक अल्पवयीन मुलगा रा. कारंजा लाड असे आरोपींची नावे आहे. उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे हे स्वत: पोलीस पथक घेऊन कारंजा लाड येथे गेले होते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. विशेष म्हणजे खून करण्याच्या आधी आरोपींनी दोन पंक्चरच्या दुकानात डल्ला टाकून टायर लंपास केले होते. (याची बातमी वणी बहुगुणीने केली होती.)
यवतमाळ रोडवर लालपुलीया परिसरात पळसोनी फाट्याजवळ रोडलगत योगेश ट्रेडर्स हा हार्डवेअरचे गोदाम आहे. या गोदामात सळाखी तसेच सिमेंट ठेवलेले आहे. या गोदामाची गेल्या 10 वर्षांपासून जीवन विठ्ठल झाडे (60) रा, आष्टोना ता. राळेगाव हे रखवाली करायचे. 28 एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी रखवालदाराचा खून करून गोदामातील सळाखी (4 बंडल 240 किलो किंमत 14 हजार रुपये) चोरून नेल्या. 29 एप्रिलला सकाळी ही घटना उघडकीस आली. या खूनाचा तपास करण्यासाठी 5 पथकं लावण्यात आले होते. अखेर 18 व्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा झाला.
काय घडलं होतं त्या रात्री?
आरोपी हे 27 एप्रिल रोजी सकाळी आरोपी हे चोरी करण्याच्या उद्देशाने कारंजा (लाड) येथून निघाले. यासाठी त्यांनी एका आरोपीच्या भावाची टाटा इंटारा ही गाडी (MH27 T2856) घेतली. ते दारव्हा, अकोला बाजार, पांढरकवडा, घोन्सा, मुकुटबन असा प्रवास करत ते वणी येथे पोहचले. दुपारी त्यांनी लालपुलिया परिसरातील एका बिर्याणीचा दुकानात जेवण केले. त्यानंतर त्यांनी चोरीच्या ठिकाणाची रेकी करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांची नजर पळसोनी फाट्याजवळील गोदामावर गेली. या ठिकाणी चौकीदार एकटा असल्याचे त्यांना समजले.
आधी टायरच्या दुकानात चोरी
सळाखी नेताना रस्त्यात सळाखींचा आवाज होतो. त्यामुळे चोरट्यांनी रात्री लालपुलिया परिसरातील एका टायर पंक्चरच्या दुकानात डल्ला मारला. मात्र तिथे पुरेसे टायर न मिळाल्याने त्यांनी दुसरे पंक्चरचे दुकान फोडले. दोन्ही दुकानातून त्यांनी 20 ते 25 जुने टायर चोरले. ते गाडीत टाकून सरळ गोदामात पोहचले. त्यांनी दोन सळाखीचे बंडल ओढून नेले. मात्र तिसरे बंडल चोरून नेताना सळाखीचा आवाज झाला व चौकीदार जीवन झाडे यांना जाग आली. ते आरडाओरड करणार तेव्हाच त्यातील एक आरोपी अजीम याने लोखंडी रॉडने जीवन यांच्या डोक्यावर वार केला. तर दुसरा वार त्यांच्या बरगडीवर केला. हल्ल्यामुळे जीवन जागीच ठार झाला. खून झाल्याने त्यांनी तिसरा बंडल न चोरताच गोदामातील सीसीटीव्ही फोडून ते गावी परत आले.
असा झाला मर्डर मिस्ट्रीचा उलगडा….
तपासात सीसीटीव्ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. चोरट्यांनी गोदामात लावलेली सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. मात्र पोलिसांनी या परिसरातील तसेच बाहेर गावातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-याची तपासणी करून फुटेज मागवले. यात त्यांना एक टाटा इंटारा गाडी घटनेच्या दिवशी संशस्यास्पद रित्या आढळून आली. प्रकरणाचा तपास सुरु असताना 14 मे रोजी वणीत टाटा इंटारा ही गाडी (MH27 T2856) संशयास्पद रित्या आढळून आली. पोलिसांना हीच गाडी घटनेच्या दिवशी रात्री आढळून आली होती. त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन विचारणा केली. मात्र चालकाने आधी उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र चालकाला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने त्या दिवशी घडलेला संपर्ण घटनाक्रम कथन केला.
उपविभागीय अधिकारी स्वत: पथक घेऊन कारंजा (लाड) येथे गेले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी रखवालदारांची हत्या केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींना वणीत आणण्यात आले. यातील एक आरोपी अजीम याचे भंगार व जुन्या टायर विक्रीचे दुकान आहे. तसेच त्याची पार्श्वभूमी गुन्ह्याची असून अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी, सपोनि दत्ता पेंडकर, पोऊनी बलराम झाडोकर, धीरज गुल्हाने, सुदाम असोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडूरे, सुहास मंदावार, विकास धडसे, विजय वानखेडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पंकज उंबरकर, अमोल अत्रेवार, अविनाश बनकर, निलेश निमकर, शाम राठोड, विशाल गेडाम, मो. वसीम, रितेश भोयर, अमोल नून्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.
Comments are closed.