मंत्र्याला पाडून निवडून येणे हा धानोरकर पॅटर्न – प्रतिभा धानोरकर

नवनिर्वाचित खासदारांची वणीत भव्य विजयी रॅली व सभा, भाजपच्या लोकांनीही मदत केल्याचा धानोरकरांचा गौप्यस्फोट

निकेश जिलठे, वणी: गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बाळूभाऊ हे पण एका मंत्र्याला हरवून निवडून आले होते. मी देखील वरोरा मतदारसंघातून एका मंत्र्याला हरवून आमदार झाले होते. यावेळी देखील लोकसभेला एका मंत्र्याला हरवून मी निवडून येणार अशी आशा होती, कारण मंत्र्याविरोधात निवडून येण्याचा हा धानोरकर पॅटर्न आहे. भविष्यात ज्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धानोरकर पॅटर्न विरोधात सिट मिळेल त्याला रात्रभर झोप लागणार नाही, असे मनोगत खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. गुरुवारी संध्या. 7 वाजता वणीत भव्य विजयी रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. भाषणात त्यांनी भाजपच्या लोकांनीही छुप्या रितीने मोठ्या प्रमाणात मदत केल्याचा गौप्यस्फोट केल्याने याची एकच चर्चा सध्या रंगत आहे.

विजयानंतर वणीत पहिल्यांदाच प्रतिभा धानोरकर यांचे आगमन झाले. सुरवातीला त्यांची लाडूतुला करण्यात आली. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयी रॅलीला सुरुवात झाली. यावेळी धोलताशाच्या गजरात व गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. रॅलीनंतर आभार सभेला सुरुवात झाली.

आपल्या भाषणात प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की भाजपच्या लोकांनी हुकुमशाही गाजवली. चुकीच्या पद्धतीने वाटचाल करीत त्यांनी जनते विरोधात निर्णय घेतले. मतदारांना त्यांची हुकुमाशाही हाणून पाडायची होती. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा जो माज आला होता, जी गुर्मी आली होती ती उतरवण्याचे काम यावेळी मतदारांनी केले. असे देखील त्या म्हणाल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भाजपच्या लोकांनीही केली मदत
संपूर्ण निवडणुकीत मविआ आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिवाचे रान करून मेहनत घेतली. गावखेड्यातील माणूसही यावेळी राबला. पण यासोबतच भाजपच्या काही लोकांनीही मदत केली, भाजपच्या अनेक निष्ठावंतानी देखील यावेळी भाजप नको होती. त्यांनी पण पडद्यामागून यावेळी मदत केली. असा गौप्यस्फोट प्रतिभा धानोरकर यांनी केला. त्यांचे हे राजकीय वक्तव्य होते की त्यांना भाजपने खरच मदत केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या बॉम्बमुळे भाजपचे मदत करणारे कोण? अशी चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.

कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती तर वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, संजय देरकर, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, टीकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, विजय नगराळे, डॉ. भाऊराव कावडे, डॉ. मोरेश्वर पावडे, उत्तम गेडाम, अजय धोबे, राजू येल्टीवार, संदीप बुरेवार, संध्या बोबडे इत्यादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खाडे यांनी केले. ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही होती. त्यामुळे हा संविधान मानणा-या सर्वांचा हा विजय आहे, असे मनोगत यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विवेक मांडवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार घनश्याम पावडे यांनी मानले. कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील मविआ व इंडिया आघाडीच्या घटकपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.