पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर आज वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन आहे. संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी, काँग्रेस समर्थक इत्यादींनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन काँग्रेस वणी विधानसभा तर्फे करण्यात आले आहे.
वणी शहरात रांगणा भुरकी येथील वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे, परंतु ही योजना कुचकामी ठरली आहे, त्यासाठी कायम स्वरूपी विहिरीचे बांधकाम करून ह्या योजननेला तात्काळ एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे, अद्यावत फिल्टर प्लांट व अतिरिक्त स्टोरेज टँक उभारण्यात याव्यात, वणी शहरात व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा यावा. कृषी पम्पाला 8 तासा ऐवजी दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
शेतकऱ्यांना शेती उपयोगी बियाणे, खते व औषध यांचे वाढलेले दर कमी करून त्यांना करमुक्त करण्यात यावे व त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना अविलंब करण्यात यावा. शेतकऱ्यांसाठी बँक मार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. वणी शहराभोवताल वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी व प्रभावी उपाययोजना कराव्या. वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित देण्यात यावा. बंद पडलेले ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरु कराव्यात.
डॉक्टर व कर्मचारी भरती करण्यात यावे व अतिरिक्त औषध साठा उपलब्ध करून देण्यात यावा. जुनाडा पुलाचे बांधकाम पूर्णत्वास होऊन 3 वर्ष लोटले आहे, या पुलाला अप्रोच रोड तयार करण्यात आलेला नाही, हे काम त्वरित करावे, वणी शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्यात यावी. कोळसा खाणी परिसरातील प्रदूषण कमी करावे. प्रदूषणामुळे कोलेरा, पिंपळी, निळापूर, ब्राह्मणी इत्यादी गावातील शेतीचे नुकसान झाले. त्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. योग्य दरात चांगल्या प्रतीची वाळू उपलब्ध करून द्यावी.
इत्यादी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.