पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातील किंग्स स्कुटर या गॅरेजला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या बाजूला किंग्स स्कुटर या नावाने गॅरेज आहे. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास या दुकानाला आग लागली. गॅरेजमध्ये ऑईल साऱखे ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चौपाटीवरील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तातडीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशामक दल यांच्यासह वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. एक ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीत दुकानातील विविध वस्तू जळाल्या. विशेष म्हणजे एक वर्षाआधीच दुकान मालकाने हे दुकान सुरु केले होते. मात्र अवघ्या एका वर्षातच ही घटना घडली.
आग विझवण्यास चालक देविदास जाधव, कर्मचारी दिपक वाघमारे, सौरभ पाणघाटे, रितेश गौतम, सेवा निवृत्त कर्मचारी शाम तांबे, व परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आगीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसांआधीच याच परिसरात एका सॉमिलला आग लागली होती.
Comments are closed.