युवा शेतकरी, व्यावसायिक ते ऍग्रो टुरिझम… आशीषची अद्भुत यशोगाथा
वणीकरांना विकेंडसाठी मिळतोय जबरदस्त पर्यात.. तयार होतोय वणी जवळ भव्य असा वॉटर पार्क व ऍग्रो टुरिझम...
वकिली शिक्षण तो घेत होता. वडिलांचा एकाएकी मृत्यू झाला. अचानक त्यांच्यावर परिवाराची जबाबदारी आली. दुर्दैवाने त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नंतर तो शेतकरी म्हणून उभा झाला. वडिलांची त्यांच्यासाठी खूप मोठी स्वप्न होती. त्याने उत्तम नोकरी करावी. स्वतःला समृद्ध करावं. हे असतानासुद्धा जबाबदारीमुळे त्याच्याजवळ शेती करण्याशिवाय पुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. परंतु ध्येयवेड्या आशीषने शेतीच्या पुढे विचार केला. मग अखेरीस कोरपना, कान्हाळगाव गाव सोडून तो वणीत आला. एक नवी वाट शोधायला. नवीन सुरुवात करायला… सुरुवात तर जोमात झाली… यशाचा ग्राफ वाढत गेला आणि आता लवकरच त्यांच्या कल्पनेतून वणी जवळ एक भव्य वॉटर पार्क व ऍग्रो टुरिझम हा प्रोजेक्ट उदयास येत आहे. वाचा आपल्या परिसरातील व्यावसायिक आशीष मोहितकर यांची यशोगाथा…
आशीष यांचे मुळ गाव कोरपना जवळील कान्हाळगाव. आशीषचे शिक्षण वणीतच झाले. पुढे आशीषने शेती ऐवजी व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने वणी येथे श्री साई मोटर्स सुझुकी ऑटोमोबाईल्स या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हीच त्यांच्या यशाची पहिली पायरी. व्यवसायाची पुढली पायरी म्हणून त्यानी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मन अस्वस्थ होते. मोठा आर्थिक आधार नव्हता. तरीही केवळ आत्मविश्वासावर त्यांनी हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. बघता बघता यात चांगली प्रगती केली.
आपल्या मातोश्रीच्या प्रत्येक शब्दाला त्यांनी मान दिला. आपल्या दोन कन्यांना शिक्षणासाठी कोरपना, वणी, नागपूर इथे त्यांची फिरस्ती होती. तरीही हॉटेल व्यवसायात त्यांनी मोठी प्रगती केली. सहकारी पतसंस्थेत त्यांनी पदही भूषविले. यातही त्यांचा प्रामाणिकपणा आणि सौजन्य दिसून येतो. व्यवसायात अपयश आले तरी खचायचे नाही, कामात सातत्य ठेवायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिश्रम. परिश्रमाशिवाय काहीही प्राप्त होत नाही हे आशीष यांच्या यशाचे खरे सिक्रेट आहे.
एक ना दोन तब्बल 15 देशांची भ्रमंती आशीष यांनी केली आहे. ही भ्रमंती केवळ टुरिस्ट प्लेस पुरती मर्यादीत राहिली नाही तर तो एक बिजिनेस टूरच असायचा. कुठे कोणता व्यवसाय सुरु आहे. परदेशातील लोक काय करतात. याचा अभ्यास ते आजही करतात. व्यवसाय जरी उत्तम सुरु असला तरी मन प्रचंड अस्वस्थ होते. शेती हा आशीष यांचा मूळ पिंड आहे. त्यामुळे त्यांच्या मनात पुन्हा एकदा शेती नाही पण शेतीशी जुळलेला व्यवसाय करण्याचा निश्चय केला.
आणखी एक नवी वाट…
शेत शिवारात जाणं सगळ्यांनाच आवडतं मात्र सर्वांकडे शेती नसते. एखाद्या निवांत वेळी शेतात जावे, गाव खेड्याचा आनंद घ्यावा. शनिवार रविवारी वीकेंडचा आनंद घ्यावा. मौज मजा करावी अशी शेती नसणा-यांची कायम इच्छा होते. मग जावं कुठं? असा विचार येतो. अनेक जण यासाठी नागपूर येथे जातात. नेमकी हीच बाब आशीष यांनी हेरली.
वॉटर पार्क, ऍग्रो टुरीझमची कल्पना
वणी हा परिसर वनसंपत्तीने नटलेला आहे. शहरालगत अनेक निसर्गरम्य स्पॉट आहेत. शेतीकाम, वॉटर पार्क सारख्या प्रचंड मोठया व्यावसायिक प्रकल्पाची पर्वणी वणीकरांना देण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी निंबाळा जवळच 22 एकर ओसाड जमीन घेतली. या ओसाड जमिनीवर नंदनवन फुलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. निंबाळा येथे भव्य असे मुक्तांगण लेक व्ह्यू वॉटर पार्क व ऍग्रो टुरिझम हा प्रोजेक्ट उदयास येत आहे.
रिझॉर्ट, वॉटर पार्क, गावाची मज्जा
सध्या या वॉटर पार्क व ऍग्रो टुरिझमचे काम जोमात सुरु आहे. यात भव्य रिसॉर्ट, प्रासंगिक भवन, वॉटर पार्क, रेस्टॉरन्ट, पार्टी हॉल याशिवाय बायोटेक्नॉलॉजीसाठी संशोधन प्रकल्पसुद्धा असणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीनंतर हा प्रकल्प वणी व परिसरातील लोकांच्या सेवेत येणार आहे.
हा प्रोजेक्ट वणी व परिसरातील सर्वात भव्य असा प्रोजेक्ट आहे. या माध्यमातून परिसरातील असंख्य शिक्षित युवक आणि युवतींना रोजगार प्राप्त होणार आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासात माता, पत्नी, कन्या तथा त्यांचा मोठा मित्रपरिवार नातेवाईक त्यांच्या पाठीशी आहेत. अशा ध्येयवेड्या आशीष मोहितकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
— संजय पेचे मो. 7020328769
Comments are closed.