खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर

आता वरोरा फाट्यावरून वणीच्या प्रवाशांना मिळणार तिकीट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागपूर ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर ही बस वरोरा बसस्थानकावर न जाता वरोरा फाटा (रत्नमाला चौक) येथे थांबते. त्यामुळे नागपूरहून वणीला येणारे प्रवासी वरोरा तिकीट काढून या फाट्यावर उतरतात. मात्र या ठिकाणी थांबा नसल्याने येथून प्रवाशी भरले जात नाही. त्यामुळे वणीला येणा-या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वणीतील प्रशांत गाडगे यांनी रत्नमाला चौक येथे बस थांबा देऊन प्रवाशांना या थांब्यावरून चढू देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून यामुळे वणीकडे येणा-या प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर झाला आहे.  

एसटी महामंडळाच्या नागपूर ते वणी बसची फेरीसंख्या अत्यल्प आहे. त्यामुळे नागपूरहून वणीला येणारे प्रवासी नागपूर-चंद्रपूर बसने वरोरा येथे येतात. महामंडळाच्या या बसचा थांबा रत्नमाला चौक येथे आहे. त्यामुळे वणीला येणारे प्रवासी या फाट्यावर उतरतात. त्यानंतर प्रवासी चंद्रपूरहून वणीच्या दिशेने येणा-या बसने वणीला येतात.

चंद्रपूरहून वणीला येणा-या बसला रत्नमाला चौकात स्टॉप नाही. त्यामुळे प्रवाशांना या स्टॉपवरून वणीला येणा-या एसटीमध्ये बसता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना आधी ऑटोने वरोरा बसस्थानकावर जावे लागते. त्यानंतर बस पकडून वणीला यावे लागते.

यात प्रवाशांचा मोठा वेळ तर खर्च होतो शिवाय ऑटोचालकाकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. वृद्ध व महिला प्रवाशांना कोणत्याही सवलतीविना खासगी बसने प्रवास करावा लागायचा. त्यामुळे नागपूर व चंद्रपूर येथून वणीकडे येणा-या बसेसला वरोरा फाटा (रत्नमाला चौक) येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी वणीतील प्रशांत गाडगे यांनी विभागीय नियंत्रक, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ यांच्याकडे केली होती.

अखेर निवेदनाची दखल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर यांनी घेतली. त्या अनुषंगाने इटीआय मशिनमध्ये आवश्यक बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रत्नमाला चौकातून वणीच्या दिशेने येणे आणखी सोपे झाले आहे. येथे स्टॉप मिळाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.