दरोडा प्रकरणी दोन संशयीत ताब्यात, व्हायरल फोटोवरून मिळाला क्ल्यू !

काय घडले त्या रात्री? वाचा मिनिट टू मिनिटचा घटनाक्रम

विवेक तोटेवार, वणी: निर्गुडा नदी जवळ असलेल्या गंगा विहार जवळ दरोडेखोरांनी सोमवारी रात्री शहरातील एका व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. गुन्हा घडताच पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज काढले होते. या व्हायरल फोटोच्या आधारावरून पोलिसांना आरोपीचा क्ल्यू मिळाला. दरम्यान दोन संशयीतांना पोलिसांनी मारेगाव येथून ताब्यात घेतले. तर इतर आरोपींची शोध घेणे सुरु असून पोलिसांचे पथक यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. 

काय घडले त्या रात्री… कसे पाठलाग करून लुटले…?
अंकुश चिंतामनी बोढे (36) हे निर्गुडा नदीजवळ असलेल्या गंगा विहार येथील बालाजी अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. त्यांचे जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे अंकुश मोबाईल शॉपी नावाने व्यवसाय आहे. ते रोज सकाळी 10.30 वाजता दुकान सुरु करतात तर रात्री 10 वाजताच्या दरम्यान दुकान बंद करतात. त्यांच्या दुकानात त्यांचा लहान भाऊ व साळा देखील मदत करतात. रविवारी वणीचा बाजार असल्याने रविवारचा व्यवसाय अधिक असतो.

सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास रविवार व सोमवारचा दुकानाचा गल्ला एका निळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून घरी निघाले होते. तर त्यांचा लहान भाऊ हा 10 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाणार होता. अंकुश हे त्यांचा साळा कुणाल पोफळे याला सोबत घेऊन घरी निघाले. अंकुश यांचा साळा दुचाकी चालवत होता. तर अंकुश मागे बॅग घेऊन होता.

लुटारुंनी पाठलाग करून पकडले…
रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास गंगा विहार जवळ त्यांच्या मागून वेगाने एक निळ्या रंगाची कार आली. त्यांनी गंगा विहारच्या गेटजवळ दुचाकीच्या समोर कार आडवी केली. कारमधून एक टीशर्ट व जिन्स घातलेला तरुण खाली उतरला. अंकुश यांना हा लुटण्याचा प्रकार असल्याची जाणीव झाल्याने ते घराकडे पळत सुटले. मात्र त्याने पाठलाग करून अंकुशला मागून पकडले.

त्यानंतर कारमधले आणखी दोघे खाली उतरून अंकुशच्या दिशेने धावले. तिघापैकी एकाने चाकू दाखवत पैशाची बॅग हिसकली तर दुस-याने गळ्यातील सोन्याची चैन झटका मारून ओढली. यात ती चैन तुटली व चैनचा अर्धा भाग खाली पडला तर अर्धी चैन चोरट्यांच्या हाती लागली. लुटारूंनी लुटताच अंकुश यांनी आरडाओरड सुरु केला. मात्र हे इतक्या कमी वेळात झाले की कुणाला मदतीला येण्याचा वेळ मिळाला नाही. हे सर्व आरोपी कारने आंबेडकर चौकाच्या दिशेने निघून गेले. दरम्यान लुटारू बॅरिकेट्स तोडून गेल्याची चर्चा रात्री उशिरा शहरात  रंगली होती. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

व्हॉट्स अपवर फोटो व्हायरल
लुटीची घटना उघडकीस येताच पोलिसांनी विविध चौकातील, रस्त्यावरील, पेट्रोल पम्प वरील सीसीटीव्ही फूटेज शोधून काढले. दरम्यान वरो-याजवळच्या एका पेट्रोल पम्पवर आरोपी कारमधून खाली देखील उतरले होते. यात आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत होते. दरम्यान काही लोकांनी हे फोटो व्हायरल केले होते. यावरून पोलिसांना दोन संशयीतांची माहिती मिळाली, अशी माहिती आहे. पोलिसांनी दोन संशयीतांना मारेगाव येथून ताब्यात घेतले. त्यांची तिथे कसून चौकशी करण्यात आली.

सीसीटीव्हीत कैद झालेली हिच ती दरोडेखोरांची कार..

या लुटीत चोरट्यांनी 6 लाख कॅश व 50 हजारांची सोन्याची चैन असा एकूण 6.50 लाखांचा ऐवज लुटला. पोलिसांनी 4 अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 3 (5) व बीएनएसच्या कलम 309 (4) नुसार गुन्हा दाखल केला.

संतप्त महिलांनी जाळला धाबा, निलगिरी बनजवळील घटना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.