संविधान वाचवण्याची लढाई अद्याप संपलेली नाही – प्रा. श्याम मानव

मानव यांच्या व्याख्यानाला वणीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पुरुषोत्तम नवघर, वणी: देशाचे संविधान निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आज तेच संविधान संपवण्याचा विडा काही राज्यकर्त्यांनी उचलला आहे. संविधान संपवण्याचा त्यांचा मोठा डाव लोकसभा निवडणुकीत जागृत जनतेने हाणून पाडला आहे. मात्र संविधान वाचवण्याची ही लढाई अद्याप संपलेली नाही. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. वणी येथे आयोजित ‘संविधान बचाओ-महाराष्ट्र बचाओ’ या अभियानांतर्गत पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक शेतकरी मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. के. टोंगे होते.

पुढे ते म्हणाले की सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. हे सरकार बनताना संविधान अक्षरशः पायदळी तुडविल्या गेले. त्यामुळे केंद्र शासनाच्या हातचे बाहुले असलेले महाराष्ट्रातील हे सरकार निवडणुकीच्या माध्यमातून हद्दपार करणे प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे, संघाला संविधान कधीच मान्य नव्हते. कारण संविधान हे सामान्य माणूस आणि धनाढ्याला समान पातळीवर अधिकार बहाल करते, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी मंचावर साहित्यिक दशरथ मडावी, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, पणन महासंघाचे संजय खाडे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, प्रा. टीकाराम कोंगरे, मराठा सेवा संघाचे अंबादास वागदरकर, भाकपचे अनिल हेपट, माकपचे कुमार मोहरमपुरी, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, अंनिसचे सुरेश झुरमुरे, राष्ट्रवादीचे प्रवीण खारकर उपस्थित होते. संचालन संजय गोडे यांनी केले, तर आभार अनिल घाटे यांनी मानले.

काँग्रेस, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, विदर्भ जनआंदोलन समिती, सेवानिवृत्त समिती यांच्यावतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रामुख्याने अनिल घाटे, प्रवीण खानझोडे, दत्ता डोहे व संत थेटे, आशिष रिंगोले आदींनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.