वणीतील सिंधी कॉलोनीतील विश्वास सुंदरानी यांना डॉक्टरेट

ठरले गणित विषयात पीएचडी पूर्ण केलेले वणीतील पहिले विद्यार्थी

निकेश जिलठे, वणी: सिंधी कुटुंब म्हटले तर डोळ्यासमोर येतो व्यवसाय. मात्र याला छेद देत वणीतील विश्वास सुंदरानी या तरुणाने गणित या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे गणित या विषयात पीएचडी होणारे ते वणी तालुक्यातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत. विश्वास हे वणीतील सिंधी कॉलोनी येथील रहिवासी असून तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) या इन्स्टीट्यूटतर्फे त्यांना ही पदवी देण्यात येत आहे. गणिताच्या न्युमेरिकल अनालिसिस या विषयात त्यांनी संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या यश बद्दल कौतुक होत आहे.

वणी ते VNIT प्रवास…
विश्वास रामचंद्र सुंदरानी हे सर्वसामान्य सिंधी कुटुंबातून येतात. त्यांचे वडिल रामचंद्र सुंदरानी हे व्यावसायिक असून त्यांचे आंबेडकर चौक येथे ठोक साखर व तेल विक्रीचे दुकान आहे. घरी व्यावसायाचं वातावरण असलं तरी विश्वास यांचं मन व्यवसायापेक्षा अभ्यासात जास्त रमले. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन त्यातच करिअर करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वणीतील विद्यावर्धनी स्कूलमध्ये झाले. माध्यमिक व ज्यु. कॉलेजचे शिक्षण त्यांनी एसपीएम महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वणीतीलच लोकमान्य टिळक महाविद्यालयातून बीएसस्सी पूर्ण केले. तर एमएस्सी (गणित) त्यांनी नागपूर येथील व्हीएनआयटी (VNIT) इन्स्टीट्यूटमधून पूर्ण केले.

2019 मध्ये ते सेट व गेट ही परीक्षा पास झाले. सध्या ते व्हीएनआयटी या इन्स्टीट्यूटमध्ये अडॉप्ट असिस्टन्ट प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतात. सेट व गेट होताच त्यांनी पीएचडी करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांना फेलोशिपही मिळाली. त्यांनी गणिततज्ज्ञ डॉ. पी. प्रमोद चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनात संशोधन सुरु केले. कोरोना काळात त्यांच्या रिसर्चमध्ये अनेक अडथळे आले. त्याचा संशोधनावर परिणाम झाला. मात्र कोरोना संपताच पुन्हा संशोधनाने वेग घेतला. जून 2024 मध्ये त्यांनी त्यांचे संशोधन पूर्ण केले. तर ऑगस्टमध्ये त्यांची पीएचडी पूर्ण झाली. लवकरच त्यांना ही पदवी प्रदान केली जाणार आहे.

मार्गदर्शक डॉ. पी प्रमोद चक्रवती यांच्यासह त्यांना संशोधनात व्हीएनआयटीचे गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. जी. पी. सिंग, विभाग प्रमुख डॉ. पल्लवी महाले, डॉ. एम देवाकर, डॉ. गली हेमचंद्र तसेच कॉलेजमधल्या अध्यापक व गणित तज्ज्ञांची देखील मदत झाली. वणीतील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. अरविंद कारखानिस व प्रा. एनगंटीवार व प्रा. महादेव बुजाडे यांच्यामुळे आपल्याला गणित विषयात शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाल्याची कबुली विश्वास यांनी दिली.

अकादमिक किंवा संशोधन क्षेत्र निवडणार – डॉ. विश्वास सुंदरानी
पीएचडी झाल्यानंतर अकादमिक क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मेडिकल किंवा इंजिनिअरिंग असे दोन प्रकारचे शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांचा रस असतो. मात्र शिक्षण हे अथांग सागर आहे. त्यात अनेक विषय आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना जो विषय आवडतो किंवा आपल्या स्किलनुसार शिक्षण घ्यावे व त्यालाच आपले करिअर निवडावे, असा संदेश ते विद्यार्थ्यांना देतात.

विश्वास यांचे याआधीच 4 रिसर्च पेपर प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे विश्वास हे सामाजिक कार्यात देखील नेहमी अग्रेसर राहतात. वणीतील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था स्माईल फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य आहे. संस्थेच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विश्वास आपल्या यशाचे श्रेय वडील रामचंद्र सुंदरानी, आई भारती सुंदरानी, मोठे वडील तुलसीदास सुंदरानी यांच्यासह मित्रपरिवारांना देतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.