निकेश जिलठे, वणी: खचाखच भरलेले मैदान… डीजेचे संगीत… अभिनेत्रीच्या दिलखेचक नृत्य… प्रेक्षकांचा एकच जल्लोष… यात रंगला दहीहंडीचा थरार… मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून गोपाळकाल्या निमित्त शुक्रवारी संध्याकाळी वणीतील शासकीय मैदानावर मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात विदर्भातील नामवंत गोविंदा पथकाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांच्या नृत्याने उपस्थितांची मनं जिंकली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांनी देखील मोठी गर्दी केली होती. दरम्यान राजू उंबरकर यांनी अल्पभूधारकर शेतक-यांना मोफत बी-बियाणे देण्याची घोषणा केली.
गोपाळकाल्या निमित्त शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवात 8 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यात चंद्रपूर, अमरावती, नागपूर, मलकापूर, धामनगाव रेल्वे, बल्लारशाह, ब्राह्मणवाडा थडी (चांदूरबाजार) इत्यादी शहरातील पथकांचा समावेश होता. सुरुवातील 8 थरावर दहीहंडी लावण्यात आली होती. त्यानंतर एक एक थर कमी करण्यात आले. धामनगाव रेल्वे येथील फ्रेंड्स गृप या गोविंदा पथकाने पाच थरांची दहीहंडी 25.41 सेकंदात फोडत 2.51 लाखांचे प्रथम बक्षिस पटकावले.
अमरावती येथील छत्रपती गोविंदा पथकाने 55 सेकंदात पाच थरांची हंडी फोडत 1.51 लाखांचे द्वितीय पारितोषीक पटकावले. तर जय महाकाली गोविंदा पथक नागपूरने 1 लाखांचे तिसरे बक्षिस पटकावले. उत्सवात बल्लारशाह येथील एक महिला पथक देखील सहभागी झाले होते. या महिला पथकाने 3 थरांची हंडी फोडत मन जिंकले. दरम्यान ब्राह्मणवाडी थडी येथील एक गोविंदा जखमी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली.
माधुरी पवारांचे दिलखेचक नृत्य
सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांच्या नृत्याला प्रेक्षकांनी एकच जल्लोष करीत प्रतिसाद दिला. त्यांनी राघू पिंज-यात आला, नाद एकच एकच, पाटलाचा बैलगाडा इत्यादी मराठी गाण्यावर नृत्य केले. कार्यक्रमादरम्यान मारेगाव तालुक्यातील रिलस्टार विलास झट्टे यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी तसेच विविध विषयावरील विलासच्या विनोदी रिल्स सध्या चांगल्याच व्हायरल होत आहे. त्यानिमित्त विलासचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी शेतक-यांना मोफत बी-बियाणे
उत्सवादरम्यान राजू उंबरकर यांनी अल्पभूधारकर शेतक-यांना मोफत बी-बियाणे वाटप करण्याची घोषणा केली. लवकरच हा उपक्रम संपूर्ण वणी विधानसभेत राबवला जाणार आहे. गेल्या वर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना राज ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजने मार्फत उंबरकर यांनी मदत केली होती. तसेच रोजगार मेळाव्याची घोषणा दहीहंडीच्या व्यासपिठावरून केली होती. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी वणीतीलच नाही ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र सैनिकांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.