विवेक तोटेवार, वणी: घरी जात असलेल्या एका कॉलेज कुमारिकेची तिघांनी छेड काढली. या प्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते पीडितेच्या कॉलेजमध्येच शिकतात.

तक्रारीनुसार, पीडिता (17) ही वणी शहरातील रहिवासी आहे. ती शहरातील एका कॉलेजमध्ये 12 व्या वर्गात शिकते. तिच्याच कॉलेजमध्ये दोन अल्पवयीन आरोपी (17) शिकतात. त्यामुळे पीडित मुलगी ही या दोघांना ओळखते. दिनांक 25 ऑगस्ट रोजी ती पायी तिच्या घरी जात होती. त्याच वेळी तिच्या मागून 2 अल्पवयीन मुलं व त्यांचा एक मित्र (23) बाईकने आलेत. त्यांनी तिला कट मारली व तिच्याकडे अश्लिल हावभाव करत तिची छेड काढली.
त्यानंतर सोमवारी 2 सप्टेंबर रोजी पुन्हा या तिघांनी पीडित मुलीची छेड काढली. सातत्याने छेड काढत असल्याने मुलीने याची माहिती आपल्या पालकांना दिली. तिच्या पालकांनी आरोपी मुलांचे घर गाठले व याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी व त्याच्या कुटुबीयांनी पीडित मुलीच्या पालकांनाच शिविगाळ केली. सातत्याने होणारी छेड सहन न झाल्याने पीडिता घाबरली. अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी तिने पालकांसह पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन अल्पवयीन मुलं व त्यांचा निजार खान (23) या तिघांविरोधात बीएनएसच्या कलम 78, 351(2), 351(3), 352(5) यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोउनि अश्विणी रायबोले करीत आहे.
Comments are closed.