वणी-नांदेपेरा रस्त्यावरील ‘तो’ विद्युत पोल ठरतोय धोकादायक
विद्यार्थी व प्रवाशांचा जीव धोक्यात... शिवसेनेचे मनोज ढेंगळे यांचे निवेदन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी ते नांदेपेरा रस्त्यावर स्वर्णलीला शाळेसमोर असलेला महावितरणचा विद्युत पोल प्रवाशांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहे. हा धोकादायक पोल तात्काळ सरळ करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेत याबाबत चर्चा केली व त्यांना निवेदन देऊन ही समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली.
काही दिवसांआधी वादळामुळे नांदेपेरा रोडवर स्वर्णलीला शाळेसमोर असलेला विद्युत पोल झुकला आहे. हा पोल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या रस्त्याने स्कूलबस आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. त्यामुळे मनोज ढेंगळे यांनी शिवसैनिकांना सोबत घेत याबाबतीत उपअभियंता यांची भेट घेत चर्चा केली. चर्चे दरम्यान ही समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र समस्या न सुटल्यास विश्वास नांदेकर यांचे मार्गदर्शनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून हा पोल झुकलेल्या अवस्थेत आहे. पोलजवळच शाळा आहे. याची महावितरणला कल्पना आहे. मात्र महावितरण याकडे जाणीवपूर्वत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनोज ढेंगळे यांनी केला आहे. निवेदन देताना मनोज ढेंगळे यांचे सोबत लालगुडा सर्कलचे विभाग प्रमुख राजू खामनकर, उपविभाग प्रमुख राजू कुंभारे, आण्याजी काकडे, गुलाब ढेंगळे, विलास दुर्गे, गणेश उज्वलकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.