विवेक तोटेवार, वणी: शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांजरी या गावात डोलामाईटची खाण आहे. मागील वर्षी या बंद खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून तीन निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला होता. अनेक जनावरे या बंद खाणीत बुडून मरण पावली आहे. या प्रकरणाची चौकशी करून मृतकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार 2 सप्टेंबर 2023 रोजी असीम अब्दुल सत्तार, नोमान शेख सादिक शेख व प्रतीक संजय मडावी या तीन बालकांचा वांजरी येथील बंद असलेली डोलामाईट खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती. या मुलांच्या कुटूंबियांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही किंवा कोणताही अधिकारी येऊन त्यांना भेटला नाही. या खाणीत कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाचे नियम धाब्यावर बसवून ही खाण अत्यंत खोल खणल्या गेली आहे. तसेच खनिकर्म विभागाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे या ठिकाणी उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. खोदकाम हे नियमाला धरून करण्यात आले की नाही याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच मृतकांच्या कुटूंबियांना याची नुकसान भरपाई देण्यात यावी व खाण बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शहान अहेमद, रितिक चांदेकर, साहिल शेख, श्रीनाथ, सोहेल शेख व मृतक बालकांचे वडील उपस्थिती होते.
Comments are closed.