वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी

नायगाव (खु.) येथील शेतक-यांचे लोकप्रतिनिधी, विविध विभागाला निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नायगाव खु, शिवारात मागीलवर्षी वन्यप्राण्यांनी कपाशी, सोयाबीन व तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात रानडुक्कर, निलगाय व इतर वन्यप्राण्यांनी नायगाव शिवारातील कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. विशेष म्हणजे शेतक-यांनी आमदार, वनमंत्री, पोलीस स्टेशन, खासदार या सर्वांनाच निवेदन दिले आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

शेतकऱ्यांनी उसनवारीवर व कर्ज काढून खते, बियाणे खरेदी केले. परंतु पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मागीलवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, वन्यप्राण्यांचा वनविभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पक्के कंपाउंड करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर एक महिन्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लक्ष्मण राजूरकर, भालचंद्र ठेंगणे, संतोष देठे, बंडू राजुरकर, संदीप राजुरकर, सुभाष राजुरकर, अशोक राजूरकर, दिलीप देठे, अविनाश देठे, अजय मेश्राम, सुनील ठाकरे, निर्दोष ठेंगणे, तुळशीदास घोंगे, महादेव ठाकरे, देवा ठाकरे, नंदकिशोर ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.