मारेगाव येथील महाआरोग्य शिबिराला 1600 रुग्णांची तपासणी
आरोग्य शिबिरामुळे रुग्णांमध्ये जागरुकता - वामनराव कासावार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: काँग्रेसतर्फे मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सुमारे 1600 रुग्णांनी या शिबिरात तपासणी केली. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर पार पडले. या महाआरोग्य शिबिरात रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले गेले. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे. अशा रुग्णांची अत्यल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात व काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या संयोजनात हे शिबिर घेण्यात आले.
सकाळपासूनच तालुक्यातील रुग्णांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता वामनराव कासावार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, गौरीशंकर खुराणा, संध्या बोबडे, मारोती गौरकार, रविंद्र धानोरकर, राजू कासावार, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, ओम ठाकूर, डँनी सँड्रावार, माया गाडगे, आकाश बदकी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माया गाडगे यांच्या मार्गदर्शनात व वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात अजाबराव गजबे, पुष्पा उलमाले, ताई भोयर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आरोग्य शिबिरामुळे रुग्णांमध्ये जागरुकता – वामनराव कासावार
कामाच्या व्यापामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अनेक रुग्ण आजारपण अंगावर काढतात. त्यामुळे आजार वाढत जातो. मोफत आरोग्य शिबिरामुळे रुग्णांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढते. असे मनोगत उद्घाटन प्रसंगी वामनराव कासावार यांनी व्यक्त केले. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. काँग्रेसतर्फे वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम सुरु राहतात. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण विधानसभा क्षेत्रात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, असे डॉ. महेंद्र लोढा म्हणाले.
दु. 1 वाजता शिबिराला सुरुवात झाली. तालुक्यातील सुमारे 1600 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. सुमारे 250 रुग्णांना गंभीर आजार असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर लोढा हॉस्पिटल वणी व मारेगाव येथे अत्यल्प दरात पुढील उपचार केला जाणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित चोरडिया, बालरोग तज्ज्ञ डॉ. पवन राणे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुबोध अग्रवाल. पोटविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय खंडाळकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार व डॉ. निखिल लांबट, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, जनरल फिजिशियन डॉ. राजेंद्र लोढा, डॉ. प्रवीण मत्ते, डॉ. नईम शेख, डॉ. विवेक गोफणे यांनी रुग्णांची तपासणी केली.
शिबिराचे व्यवस्थापन अंकुश माफूर यांनी केले. तर औषधी विभागाची जबाबदारी दुष्यंत जयस्वाल यांनी सांभाळली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्त तपासणी विभागाचे खापर्डे, काँग्रेसचे तुळशीराम कुमरे, समीर कुळमेथे, शाहरुख शेख, नंदेश्वर आसुटकर, रवि पोटे, यादवराव पांडे, यादवराव काळे, सुरेश चांगले यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, लोढा हॉस्पिटल मारेगाव व लोढा हॉस्पिटल वणी यांच्या चमुंनी परिश्रम घेतले.
Comments are closed.