वणी काँग्रेसला की शिवसेनेला? ‘या’ तारखेनंतर सुटणार तिढा

काय घडले 'त्या' गुप्त बैठकीत? राजकीय खेळी की आणखी काही...

निकेश जिलठे, वणी: जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी उमेदवारांची, मतदारांची उत्कंठा शिगेला पोहचत आहे. त्यातच वणी विधानसभेची जागा शिवसेनेला की काँग्रेसला जाणार? याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 1990 पासून सलग तीन टर्म व 2009 चा विजय काँग्रेसला विजय मिळाला होता. याशिवाय सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यामुळे काँग्रेसचे पारडे जड आहे. 2004 मध्ये शिवसेनेने विजय मिळवला होता. 2014 मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढलेले असताना शिवसेना दुस-या क्रमांकावर होती. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेससह शिवसेनेचा दावा देखील मजबूत आहे. दरम्यान शहरात एका बैठकीची चर्चा सध्या रंगत आहे. ही राजकीय खेळी आहे की आणखी काही, याचा आढावा आजच्या विश्लेषणात घेऊ.

‘या’ मतदारसंघात एकाच पक्षाचा दावा
विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने विदर्भात काँग्रेस सर्वाधिक जागा लढणार आहेत. त्यानंतर शिवसेना (उबाठा) व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना जागा मिळणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजूरा, वरोरा व आर्णी विधानसभा या तीन विधानसभेसाठी महाविकास आघाडीतून एकाच म्हणजे काँग्रेसचा दावा समोर आला आहे. यातील वरोरा व राजूरा या दोन जागी 2019 मध्ये काँग्रेसनेच विजय मिळवला होता.  त्यामुळे या दोन जागा व आर्णी अशा तीन जागा काँग्रेसच्या पारड्यात जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर चंद्रपूर, वणी, बल्लारपूर या तीन जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात एक जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद ही जागा आधीच राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) क्वोट्यात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद व संघटन कमी असल्याने ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे, त्या जिल्ह्यात एका ऐवजी दोन जागेंवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा फारसा दावा नसल्याने चंद्रपूर, वणी, बल्लारपूर या तीन जागेपैकी एका जागेवर काँग्रेसचा मित्र पक्ष शिवसेनेचा दावा राहणार, हे निश्चित आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेवटच्या सर्वेचा निकाल अद्याप बाकी
सध्या काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे वेगवेगळे सर्वे सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची एक वेगळी सर्वे टीम कार्यरत आहे. यासह तिन्ही पक्षाचा मिळून महाविकास आघाडीची आणखी एक सर्वे टीम कार्यरत असल्याची माहिती आहे. या सर्व एजन्सीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जागावाटपाबाबत दोन दिवसांनी पक्षश्रेष्ठी, निरीक्षक यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वेच्या निकालाचा आधार घेऊन जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे. पक्षाची ताकद, उमेदवाराची ताकद इत्यादी गोष्टी विचारात घेऊन जागा कुणाला सुटणार, हे यात निश्चित केले जाणार आहे.

‘त्या’ गुप्त बैठकीत काय घडले?
गुरुवारी संध्याकाळी काँग्रेसच्या एका वरीष्ठ नेत्यांच्या घरी निकटवर्तीयांना सोबत घेऊन एक मिटिंग झाल्याची चर्चा आहे. या मिटिंगमध्ये वरीष्ठ नेत्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा संदर्भ देत वणीची जागा शिवसेनेला सुटल्याचे जाहीर केल्याची चर्चा वणीत रंगत आहे. मात्र त्या वरीष्ठ नेत्यांनी आणि बैठकीत हजर असलेले नेते याचे खंडण करीत आहे. वणीवर काँग्रेस इतकाच शिवसेनेचा दावाही मजबूत आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहण्यासाठी आपल्याला ताकद वाढवावी लागेल, असे वक्तव्य वरीष्ठ नेत्याने केल्याचा दावा मिटिंगमध्ये हजर असलेल्या नेत्यांचा आहे.

शिवसेनेवर सध्या गटातटाचा आरोप आहे. मात्र काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहे. निवडणूक जवळ येताच काँग्रेसमधल्या या दोन गटातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वेचा निकाल केवळ पक्षश्रेष्ठींना माहिती होत असला तरी एका गटातील नेता लोकप्रियता, जनसंपर्क यासह सर्वेत पुढे असल्याची चर्चा शहरात आहे. तर दुस-या गटातील नेता अनुभव, संघटन इत्यादी बाबतीत पुढे आहे. दोन गटात रस्सीखेच सुरु असताना गुप्त बैठकीतील ‘गुप्त’ चर्चा बाहेर आल्याने खळबळ उडणे सहाजिक आहे. मात्र हा केवळ राजकीय खेळीचा भाग असू शकतो. असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तर जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने आनंद व्यक्त करणे घाईचे होईल, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेच्या (उबाठा) एका नेत्याने खासगीत ‘वणी बहुगुणी’ला दिली.

वणीची जागा अद्याप जाहीर नाही
कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटणार, हे शेवटपर्यंत पक्ष गुप्त ठेवले जाते. जागा कुणाला सुटणार हे आधीच बाहेर आल्यास पक्षाला बंडखोरीचा फटका बसतो. त्यामुळे ज्या जागेवर इतर कोणत्याही पक्षाचा दावा नसतो, त्या आधी जाहीर केल्या जातात. तर ज्या जागेवर तिढा आहे. अशा जागा शेवटच्या क्षणी जाहीर केल्या जातात. लोकसभेच्या वेळी देखील मविआने याच स्ट्रॅटेजीचा वापर केला होता. त्यामुळे वणीची जागा ही शेवटच्या क्षणी जाहीर होणार, हे निश्चित आहे. तोपर्यंत विविध राजकीय चर्चा, रस्सीखेच या गोष्टी सुरुच राहणार. 

Comments are closed.