बोटीद्वारे वाळू उपशाची महसूल कडून तपासणी
वणी(रवि ढुमणे): वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात येणाऱ्या भुरकी येथील दोन शेतकऱ्यांच्या हद्दीतून वाळू लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा केल्याचे वृत्त “वणी बहुगुणी ने”प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभागाला जाग आली. दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा करीत असतानाच सदर तपासणी केली. आता महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात येणाऱ्या रांगणा शेत शिवारातील अनिल सोनटक्के व नानाजी लांबट या दोन शेतकऱ्याच्या शेतजमिनी च्या हद्दीतून वरोरा येथील कंत्राटदाराने बोटीच्या साहाय्याने वाळूचा अवैध उपसा करून नियमबाह्य उत्खनन केल्याचे वृत्त “वणी बहुगुणीने” प्रकाशीत केले होते. वाळूचा अवैध उपसा होत असताना स्थानिक तहसीलदार, मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी मात्र मूग गिळून गप्प बसले होते. या अवैध वाळू उपशामुळे सदर शेतकरी व शासनाच्या महसूल कराचे अतोनात नुकसान होऊ लागले होते. असे अनेक गंभीर प्रकार प्रशासनाच्या व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने खुले आम सुरू आहेत. मात्र या प्रकाराकडे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत.
भुरकी येथील शेतकऱ्याच्या शेतातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासन जागे झाले अन रांगणा घाटावर जाऊन त्यानी पाहणी केली असल्याची माहिती मिळाली. आता या दोन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार काय? व संबंधित कंत्राटदारावर कोणती कारवाई करणार? की सदर प्रकरणाचा गाशा गुंडाळणार हे सध्यातरी अनुत्तरीतच आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.