वणीचे मुलं-मुली चमकले राज्यस्तरीय लाठीकाठी खेळ स्पर्धेत

16 पदकं प्राप्त करीत शिवानंद गृपने गाजवली सिलंबम स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भद्रावती येथे आयोजित सिलंबमच्या (लाठीकाठी) राज्यस्तरीय स्पर्धेत वणीतील शिवानंद गृपच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत 16 पदकं मिळवलीत. यात 7 सुवर्ण पदक, 6 रौप्य तर 3 ब्राँझ पदकांचा समावेश आहे. दि 28 व 29 सप्टेंबर रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र स्टेट सिलंबम चॅम्पयनशिप ही स्पर्धा घेण्यात आली. सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.

सिलंबम हा प्राचीन भारतीय मार्शल आर्टचा प्रकार आहे. लाठी, तलवार, भाला याचा वापर करून हा खेळ खेळला जातो. प्राचीन भारतीय पारंपारिक खेळ प्रकाराला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सिलंबम या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. भद्रावती येथील स्पर्धेत वणी येथील तेजस्वीनी गव्हाणे व श्रावणी घोसरे यांनी प्रत्येकी 2 सुवर्ण, मोक्षिता देठे 1 सुवर्ण व 1 रौप्य, खुशी सहारे 1 सुवर्ण व 1 रौप्य, महेश्वरी गव्हाणे 1 सुवर्ण व 1 ब्रॉन्झ, जान्हवी चिकटे 2 रौप्य, दुष्यंत गव्हाणे 1 रौप्य व 1 ब्राँझ, ज्योती सहारे 1 रौप्य 1 ब्राँझ पदकं मिळवली.

फ्री स्टाईल, मिडेल स्टिक रोलिंग आणि स्टिक फाईटींग या प्रकाराचे हे पदकं मिळाले आहेत. स्पर्धेत शिवानंद गृपचे संचालक व कोच राजू गव्हाणे यांचा उत्कृष्ठ कोच म्हणून सन्मान करण्यात आला. सदर विद्यार्थी वणीत दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी, सामाजसेवक डॉ महेंद्र लोढा यांच्याद्वारे सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.