ए-बी फॉर्म घेऊन संजय देरकर यांचे वणीत आमगन, जल्लोषात स्वागत

लढाई जिंकण्यासाठी मविआच्या घटक पक्षांनी, शिवसैनिकांनी एकत्र या, संजय देरकर यांचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारपासून मुंबईत तळ ठोकून असलेले संजय देरकर यांचे आज दुपारी ए-बी फॉर्म घेऊन वणीत आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. गुरुवारी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए-बी फॉर्म मिळाला. ते रात्रीच वणीला पोहोचणार होते. मात्र फ्लाईट कॅन्सल झाल्याने ते ट्रेनने वणीसाठी निघाले. सकाळी त्यांचे वर्धा व तिथून त्यांनी वणीसाठी प्रस्थान केले. संत जगन्नाथ महाराज देवस्थान येथे त्यांचे दुपारी आगमन झाले. त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोलताषांच्या गजरात एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. लढाई जिंकण्यासाठी मविआच्या सर्व घटक पक्षांनी तसेच सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावे, असे आवाहन संजय देरकर यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केले. 

दुपारी 12.30 वाजता संजय देरकर यांचे वणीतील वरोरा रोड येथील संत जगन्नाथ महाराज देवस्थान येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यावर हारतु-यांचा वर्षांव करण्यात आला. सर्व कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आवाज कुणाचा, कोण आला रे कोण आला, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला. देवस्थानानंतर त्यांनी छ. शिवाजी महाराज चौक येथे जाऊन छत्रपतिंच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र या – संजय देरकर
भाजपच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतमाला भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गोरगरीब, शेतमजूर, अल्पसंख्यांक, ओबीसी, दलित सर्वांनाच भाजपच्या धोरणांचा फटका बसत आहे. महिला असुरक्षीत आहेत. संविधानिक मुल्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे संविधान धोक्यात येत आहे. भाजपला सत्तेपासून रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. या लढाईत मला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची, तळागाळातील सर्व शिवसैनिकांची तसेच सर्वसामान्य मतदारांची साथ हवी आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे मी नम्र आवाहन करीत आहे.
– संजय देरकर, शिवसेना (उबाठा)

लवकरच नामांकन दाखल करणार
संजय देरकर यांना शिवसेनेचे तिकीट जाहीर होताच विधानसभा क्षेत्रातील विविध गावात बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेचे जुने कार्यकर्ते, अनेक गावातील मविआचे कार्यकर्ते व स्थानिक नेते देरकर यांच्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी देरकर यांची भेट घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले. लवकरच ते नामांकन दाखल करण्याची तारीख जाहीर करणार आहेत.

संजय देरकर यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक नेते देखील उपस्थिती दर्शवली. हा संजय देरकर यांना एक दिलासा मानला जात आहे. सध्या वणी विधानसभा क्षेत्रासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेनेचे संजय देरकर व मनसेचे राजू उंबरकर यांच्यात तिरंगी लढत होण्याचे चिन्ह आहेत.

Comments are closed.