विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी निघालेल्या रॅलीत वणी तसेच ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने कार्यकते, महाराष्ट्र सैनिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मान्यताप्राप्त पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजू उंबरकर हे पहिले उमेदवार ठरले आहे.
दुपारी 12 वाजता वणीच्या शासकीय मैदान येथे हजारोच्या संख्येने राजू उंबरकर यांचे समर्थक गोळा झाले होते. यावेळी शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी शहरात रॅली काढली. ढोलताशाच्या गजरात निघालेली ही रॅली शासकीय मैदान ते टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड ऑइल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयासमोर दाखल झाली. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
ग्रामीण भागातील समर्थकांची हजेरी
आजच्या रॅलीमुळे राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागातील प्रभाव दिसून आला. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरीक या रॅलीला उपस्थित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून राजू उंबरकर यांचे सेवाभावी कार्य सुरु आहे. ते कायमच गोरगरीब जनतेच्या कामासाठी धावून जातात. त्यांच्या या कार्याची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.
Comments are closed.