युवासेनेचा राडा, 10 दिवसांपासून रेल्वे सायडिंगवर पाण्याचे सिंचन बंद

परिसरात कोळशाच्या धुळीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 10 दिवसांपासून वणीतील रेल्वे स्थानका लगत असलेल्या रेल्वे साईडिंगवर पाण्याचे सिंचन बंद आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढले असून नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. काही नागरिकांनी याची तक्रार युवासेनेकडे केली. त्यामुळे शनिवारी दुपारी युवासेनेद्वारा रेल्वे साईडिंगवर जोरदार राडा करण्यात आला. युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून जर पाण्याचे सिंचन नियमित राहिले नाही, तर रेल्वे साईडिंग बंद करण्यात येईल, असा इशारा अजिंक्य शेंडे यांनी दिला.

वणी रेल्वे स्थानकला लागून वेकोलिची रेल्वे सायडिंग आहे. या रेल्वे सायडिंगवर दररोज शेकडो अवजड ट्रकच्या माध्यमातून हजारो टन कोळसा रेल्वे रॅकमध्ये टाकण्यात येतो. त्यानंतर मालगाडीत भरून विविध पॉवर प्लांटमध्ये पाठविण्यात येतो. यावेळी धूळ उडू नये म्हणून सायडिंगवर पाण्याचे सिंचन केले जाते. मात्र 10 दिवसांपासून ते करण्यात आले नाही. त्यामुळे प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. याबाबत परिसरातील काही नागरिक व महिलांनी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांची भेट घेऊन समस्या सांगितली. अजिंक्य शेंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रेल्वे सायडिंगवर जाऊन रोडा केला. त्यांनी व्यवस्थापक श्रवणकुमार यांची कानउघाडणी केली.

पाण्या ऐवजी ‘कंची’ मारणे सुरु !
या ठिकाणी 12 हजार लिटर पाणी टँकर क्षमता असलेल्या टँकरचा उपयोग केला जावा असा नियम आहे. परंतु, या ठिकाणी 3 हजार लिटरच्या टँकरने पाणी मारले जात आहे. जेव्हा निविदा घेणाऱ्याकडे 12 हजार लिटर क्षमता असलेले वाहन नाही, तेव्हा त्याला निविदा दिली तरी कशी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या 10 दिवसांपासून धुळीवर पाणी मारणे बंद असताना वेकोलि प्रबंधक मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. असा आरोप होत आहे.

याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सायडिंग इन्चार्ज श्रवण कुमार विचारणा केली असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला आम्ही याबाबत पत्र दिले आहे. अशीच तक्रार वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करण्यात आली आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे कारवाईचा निर्णय वेकोलि अधिकारी घेणार, अशी प्रतिक्रिया दिली. आंदोलनात बादल येसेकार, आर्या राऊत, रुद्राक्ष सीडाम, हेमंत चवले, रोहन गंदेवार, महेश बलकी, नीलेश कडूकर, आदित्य पेटकर, ईशान झाडे, गोलू बदकी, धनु मडावी, तेजस नागतुरे, किशोर ठाकरे, रोशन काकडे, आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.