निकेश जिलठे, वणी: महाविकास आघाडीची तिकीट शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेली. या जागेवर काँग्रेसचे संजय खाडे यांचा दावा प्रबळ होता. त्यांनी सर्व स्तरातून तिकीटासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशा आली. तेव्हापासून ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वणीत ते सांगलीचा ‘विशाल पाटील’ पॅटर्न राबवणार आहेत. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने संजय खाडे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे वणी विधानसभेची लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वणी विधानसभेचे तिकीट शिवसेनेला गेल्यानंतर संजय खाडे यांची भूमिका काय राहिल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. शनिवारी रात्री संजय खाडे यांचे दिल्लीवरून वणीत आगमन झाले. आज सकाळी खाडे यांची त्यांच्या समर्थकांसोबत बैठक झाली. या बैठकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
रीलने दिला उमदेवारीचा सिग्नल
आज रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास संजय खाडे यांच्या समर्थकांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘आता फायनल ठरलंय, वणी विधानसभेत राबवणार सांगलीचा विशाल पाटील पॅटर्न’ अशा आषयाची रील व्हायरल व्हायला सुरुवात झाली. हा त्यांच्या उमेदवारी दाखल करण्याचा एक सिंग्नल होता. त्यामुळे दुपार पासूनच संजय खाडे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशी चर्चा शहरात रंगायला सुरुवात झाली. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने संजय खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
वणीत सांगली पॅटर्न राबवणार – संजय खाडे
गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघ पिंजून काढला आहे. वणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. व काँग्रेसचाच या जागेवर दावा होता. मात्र ही जागा शिवसेना (उबाठा) च्या वाटेला गेली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच व त्यांच्या प्रेमापोटीच मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस
संजय खाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास वणी विधानसभेची लढत चौरंगी होईल. तसेच ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह आहे.
Comments are closed.