जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आ. बोदकुरवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हजारो कार्यकर्ते, लाडक्या बहिणी पोहोचल्या रॅलीत, ढोलताशाच्या गजरात निघाली रॅली

निकेश जिलठे, वणी: लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व इंडिया आघाडीने संविधानाबाबत खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. या वेळी महाविकास आघाडी लाडकी बहिण योजना बंद होणार असा खोटा प्रचार करत आहे. मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणूक झाली. मात्र तिथे आतापर्यंत लाडली बहिण योजना बंद झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना बंद होणार नाही, ही नरेंद्र मोदी यांची गॅरन्टी आहे. त्यामुळे या वेळी खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी शासकीय मैदानात विजयी संकल्प शंखनाद सभेत मतदारांना केले. आज आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्त रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर शासकीय मैदानात विजयी संकल्प शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

भाजपचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी ढोलताशाच्या गजरात संपूर्ण वणी शहरात रॅली काढण्यात आली. रॅलीला संपूर्ण मतदारसंघातून कार्यकर्ते, महिला आणि समर्थक पोहोचले होते. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅली व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खास मध्य प्रदेशहून कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल वणी येथे आले होते.

सकाळी 11 वाजेपासूनच कार्यकर्ते व समर्थकांनी शासकीय मैदान येथे रॅलीसाठी गर्दी केली होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशा, साउंड सिस्टम, पारंपरिक गोंडी वाद्यांच्या गजरात निघालेली ही रॅली शासकीय मैदान ते टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड ऑइल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयासमोर दाखल झाली. दरम्यान ठिकठिकाणी चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. रॅलीत सुमारे 8 ते 10 हजारांची उपस्थिती होती, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शासकीय मैदानात सभा पार पडली. यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले.

कामाचे मुल्यमापन करूनच मतदान करा – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
आज पर्यंत सर्वाधिक विकासकामे माझ्या कार्यकाळात झाले. विकासाची गंगा मी शेवटच्या गावापर्यंत पोहोचवली. माझ्या आधी झालेल्या आमदारांच्या कामाचे आणि माझ्या 10 वर्षांच्या काळातील कामाचे आधी मुल्यमापन करा, त्यानंतर मला मतदान करा. असे आवाहन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सभेत केले. भविष्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे 2 हजार किंवा अडीच हजार होऊ शकते. मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी भाषणात मतदारांना केले.

विजयी संकल्प शंखनाद सभेचे संचालन संजय पिंपळशेंडे यांनी केले. यावेळी रिपाई (आठवडे) गटाचे वर्सुकेत पाटील, शिवसेना (शिंदे) गटाचे मोरेश्वर सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार श्रीकांत पोटदुखे यांनी मानले. रॅलीमध्ये तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवि बेलूरकर, विजय पिदूरकर, आशिष मोहितकर, अभिनव भास्करवार, ललित लांजेवार, महादेव खाडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, मोबीन, वर्सुकेत पाटील, श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, मोरेश्वर सरोदे यांच्यासह ग्रामीण भागातील नेते इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Comments are closed.