भाजपचा वणी विधानसभा क्षेत्रासाठी वचनमाना जाहीर

आ. बोदकुरवार यांनी जाहीर केला विधानसभा क्षेत्रासाठी दशसूत्री कार्यक्रम 

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 10 वर्षात वणी विधानसभेचा अभूतपूर्व विकास झाला. मात्र अद्यापही काही विकास कामे अपूर्ण आहेत. पुढल्या पाच वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. नागरिकांना वीज, पिण्याचे पाणी, धान्य, मोफत आरोग्यसेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार, कला इत्यादी सर्व क्षेत्रातील विकास पुढल्या पाच वर्षात करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे नागरिक नक्कीच यावेळी विकासाची संधी देईल असा विश्वास आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला. वणीतील भाजप प्रचार कार्यालयात भाजपच्या स्थानिक संकल्प पत्राचे विमोचन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेच्या स्थानिक विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम जाहीर केला.

या दशसूत्री संकल्पपत्रात वणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिकीकरण करून यंत्रसामुग्रीने सुसज्ज करणे, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अत्याधुनिकरण करणे, वणी येथील अतिरिक्त एमआयडीसी निर्माण करणे, झरी तालुक्यात नवीन एमआयडीसी निर्माण करणे, तर मारेगाव येथे मजूर एमआयडीसी सुरु करणे, सर्व बाजारपेठांमध्ये सर्व पिकांना हमी भावाने शासनाचे खरेदी केंद्र उघडणे.

वणी येथील बसस्थानकाचे अद्ययावतीकरण करणे, महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सुरु करणे, यासह नवीन बसेस सुरु करणे, तहसील कार्यालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, पोलीस स्टेशन येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेतू सुविधा केंद्राची स्थापना करणे, 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी व्यवसायांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणे, वणी येथे सर्व विभागाचे उपविभागीय कार्यालय उघडणे, विधानसभा क्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे. इत्यादी विषयांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र संकल्पपत्राचाही उल्लेख करत त्यातील प्रमुख मुद्दांवर लक्ष वेधले. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु 1500  वरुन रु 2100  देण्यात येतील. तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी 25, 000 महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. 12, 000  वरून रु.15,000 तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल. या प्रमुख मुद्दांचा आ. बोदकुरवार त्यांनी उल्लेख केला.

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल. वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील. येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल. राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील. अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु १५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल. वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल. इत्यादी मुद्दे भाजपच्या संकल्प पत्रात आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.