बहुगुणी डेस्क, वणी: घरी असलेल्या लिंबाच्या झाडाचे लिंब तोडण्यावरून दोन कुटुंबीयांत वाद झाला होता. मात्र या वादाचा राग मनात धरून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यात सतीश अशोक थेरे नामक हा तरुण जखमी झाला आहे. तालुक्यातील विरकुंड येथे ही घटना घडली. सतीशच्या तक्रारीवरून तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सतीश अशोक थेरे (26) हा विरकुंड ता. वणी येथील रहिवासी आहे. तो मजुरी करतो. गावातच सुधाकर परचाके राहतो. सतीश व सुधाकर या दोघांचे आपसात पटत नाही. सुधाकर हा नेहमी सतीश व त्याच्या आईला शिविगाळ करून मारण्याची धमकी देतो. काही दिवसांपूर्वी सतीश यांच्या घरी लिंबू तोडण्यावरून सुधाकर व सतीश यांच्यात वाद झाला होता. मात्र हा वाद तिथेच मिटला. मात्र सुधाकर याने हा राग मनात धरून ठेवला होता.
सोमवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सतीश हा घरी होता. तेव्हा सुधाकर हा सतीशच्या घरी आला. त्याने सतीशला घरी चल म्हणत तो सतीशला घरी घेऊन गेला. सुधाकरने लिंबू तोडण्यावरचा जुना वाद उकरून काढला व सतीशला लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी सुधाकरची पत्नी व मुलगा देखील मारहाण करण्यास सतीशच्या अंगावर धावले. यात सतीशच्या डोक्याला व डाव्या करंगळीला दुखापत झाली.
दुस-या दिवशी सतीशने वणी पोलीस स्टेशन गाठत सुधाकर व त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सुधाकर परचाके, त्याची पत्नी व मुलाविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई संतोष आढाऊ करीत आहे.
Comments are closed.