विवेक तोटेवार, वणी: माळीपुरा येथील एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास माळीपुरा भागात ही घटना घडली. प्रणय मुकुंद मूने (अंदाजे 21) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो घरसंसार सेलजवळील गायकवाडचा वाड्याजवळ आईसह राहतो. तो एका गाडीच्या शोरुममध्ये काम करतो. सकाळी 9 वाजताच्या सुमारास प्रणयच्या ओळखीचे दोघे जण घरी आले. यावेळी प्रणयची आई बाहेरगावी गेल्याने घरी तो एकटाच होता. ते दोघे प्रणयला भेटले. तिथे दोघांचा प्रणयशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी प्रणयवर धारदार शस्त्राने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती आहे.
घराशेजारीच प्रणयची काकू राहते. ती कचरा फेकण्यासाठी घराबाहेर बाहेर आली असता तिला प्रणयचा किंचाळण्याचा आवाज आला. ती धावत प्रणयच्या घरी गेली असता तिला खोलीत प्रणय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी दोघे तरुण होते. प्रणयच्या काकू लगेच घराच्या बाहेर आल्या व त्यांनी दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे हल्लेखोर आत अडकले. दुसरीकडे तिने याची माहिती शेजा-यांना दिली. शेजारी तातडीने घरी आले. त्यांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले व प्रणयला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ते दोघेही हिंगणघाट येथील असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे. हल्ला होताच ही घटना वा-यासारखी वणी शहरात पसरली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकांनी माळीपुरा व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. हल्लेखोर वणीत का आले होते. त्यांनी प्रणयवर हल्ला का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेमुळे वणी शहर हादरुन गेले आहे. सध्या प्रणय याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
(सदर बातमी प्राथमिक माहितीवर तयार करण्यात आलेली आहे. अधिक माहिती येताच बातमी अपडेच केली जाईल.)
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.