बहुगुणी डेस्क, वणी: एका भामट्याने कॉल करून एका कर्मचा-याला 5 लाखांचा गंडा घातला. निवडणूक काळात ही घटना घडली. प्रमोद पुंडलिक राजूरकर असे फसगत झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. त्यांना दोन्ही अकाउंटमधून तब्बल 41 वेळी ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे. सिम बंद झाल्याची बतावणी करून सायबर भामट्याने हा गंडा घातला आहे. परिसरात सातत्याने कॉलद्वारा फसवणुकीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
प्राप्त माहिती नुसार, प्रमोद पुंडलिक राजूरकर (53) विठ्ठलवाडी वणी येथील रहिवासी आहेत. ते जनता विद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया व यूनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेत त्यांचे खाते आहे. त्यांच्या बँक खात्याला जिओ कंपनीचा मोबाईल नंबर व आधार कार्ड लिंक आहे. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यांना सुरु कॉलमध्ये काही नंबर प्रेस करण्याच्या सूचना आल्या. त्यानंतर दोन तासांनी त्यांचे सिम कार्ड बंद पडले. त्यांनी वणीतील जिओ सर्विस सेंटरवर जाऊन याची तक्रार केली असता त्यांचे सिम कार्ड सुरू झाले. त्यानंतर एकदोनदा त्यांचे सिम बंद झाले. पण तक्रारीनंतर ते पुन्हा सुरु झाले.
दिनांक 19 नोव्हेंबर रोजी प्रमोद राजूरकर यांची निवडणूक ड्यूटी लागली होती. त्या दिवशी त्यांचे सिम बंद पडले. मात्र निवडणुकीची गडबड असल्याने त्यांनी याची सर्विस सेंटरकडे तक्रार केली नाही. निवडणूक ड्युटी झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला त्यांनी जिओ सेंटरला भेट दिली. तेव्हा त्यांना सिम कार्ड पूर्णपणे बंद झाल्याचे सांगण्यात आले. सिम सुरु होण्याची शक्यता नसल्याने त्यांना नवीन सिम घेण्याबाबत सुचविण्यात आले. त्यामुळे त्यांनी तात्पुरते नवीन सिम कार्ड घेतले.
त्यांना जुनाच नंबर हवा असल्याने वणीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मारेगाव सर्व्हिस सेंटर येथे जाण्यास सांगितले. मारेगावला गेल्यानंतर त्यांना त्यांचा जुना नंबर मिळाला. जुना नंबर सुरू होताच त्यांना एसएमएस मिळणे सुरु झाले. त्या एसएमएसमध्ये त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून 50 हजार रुपये विड्रॉल झाल्याचा मॅसेज आला. बँक खात्यातून परस्पर व्यवहार झाल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच बँकेत धाव घेतली.
त्यांनी सेंट्रल बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्याच्या बैंक खात्यातून तब्बल 28 वेळा ऑनलाईन व्यवहार झाले असल्याचे सांगण्यात आले. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या वणी शाखेतून तब्चल 3 लाख 93 हजार रुपये यूपीआयद्वारे त्यांच्या बँक खात्यातून विड्रॉल करण्यात आले असल्याचे बैंक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांचे दुसरे खाते तर सुरक्षीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते युनियन बँकेत गेले. तिथे त्यांना त्यांच्या खात्यातून 13 वेळा ट्रान्झॅक्शन झाले व यातून 1 लाख 16 हजार रुपये उडवण्यात आल्याचे कळले.
सायबर हल्लेखोरांपासून सावध राहा
सायबर हल्लेखोर विविध नवनवीन शक्कल लढवून गंडा घालतात. कधी सिम बंद होणार, कधी एटीएम कार्ड बंद होणार तर कधी तुमचे बँक अकाउंट बंद होणार असे विविध कारणं सांगितले जाते. कधी बक्षिस लागले, लोन मिळणार आहे अशी बतावणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला कॉल करून एक दाबा, दोन दाबा अशा सूचना येतात. तर कधी एखादी लिंक पाठवली जाते. अशा प्रकारचे कोणतेही फोन आल्यास आपल्या बँक खात्यासंबंधी, आधार कार्ड संदर्भात किंवा मोबाईलवर आलेली कोणतीही माहिती शेअर करू नका. ओटीपी कधीही शेअर करायचा नसतो. तसेच कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो.
त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 318 (4). 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.